दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात पुसे सावळी मसूर वडूज भागात घरफोडी करणाऱ्या पाच जणांच्या बीड जिल्हयातील टोळीला सातारा पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले . कसून झालेल्या चौकशीत त्यांनी पाच घरफोडया केल्याचे मान्य केले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली .
सातारा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागात छाेटे माेठ्या चाे-या हाेत हाेत्या. त्यातूनच काही ठिकाणी दराेड्याच्या घटना घडल्या. यामध्ये पाच जानेवारीस पुसेसावळी (ता. खटाव) येथील दराेड्यात एकूण ५ लाख २० हजार रुपयांचे दागिने गेल्याची फिर्याद संजय आप्पासाे कदम यांनी नाेंदवली हाेती.
दाेन मार्चला संताेषीमातानगर (मसूर) येथील पूजा वारे यांच्या घरात पडलेल्या दराेड्यात ४ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चाेरीस गेला हाेता. ११ मार्चला वडूज येथील शिवाजी भिकू ननावरे यांनी एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरीस गेल्याची तक्रार पाेलिसांत केली हाेती.
या गुन्ह्यांचा कसून तपास करावा असे आदेश पाेलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच संबंधित पाेलीस ठाण्यांना दिले हाेते. त्यानूसार एलसीबीने वडूजला ज्या ठिकाणी घटना घडली तेथे भेट दिली. तेथून तपासाची चक्रे फिरवत कर्जत, बीड पर्यंत गुन्हेगारांचे धागेदाेरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार सातारा पाेलिस दलाने माहिजळगाव, कर्जत (जि. नगर) आणि आष्टी (जि. बीड) येथे जाऊन पाच संशयित आराेपींना अटक केली.
अविनाश उर्फ काल्या सुभाष भाेसले, अजय सुभाष भाेसले, सचिन सुभाष भाेसले (माहिजळगांव, कर्जत, नगर) तसेच राहूल पदु भाेसले (वाळुंज, बाबुर्डी, नगर) आणि हाेमराज काळे (वाकी, आष्टी, बीड) अशी अटक केलेल्या संशयित आराेपींची नावे आहेत.