मधुमक्षिका पालन हा फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय – सौ. वेदांतिकाराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य ,सातारा, दि. ०२: आपला देश कृषिप्रधान देश आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट आदी समस्यांमुळे शेतीमध्ये अनंत अडचणी येत असतात. शेतकरी आर्थिक सक्षम राहण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय हा एकमेव पर्याय आहे. मधुमक्षिका पालन हा फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय असून त्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या व्यवसायातून आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या अभयसिंहराजे भोसले सांस्कृतक भवन येथे मध संचालनालय महाबळेश्वर, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वाघेश्‍वरी एग्रो शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत मधमाशा पालन करण्याबाबतचे तांत्रिक प्रात्यक्षिके व जनजागृती या विषयावर आयोजित एक दिवसीय शिबिराच्या उदघाटनप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, संचालक अशोकराव पाटील, कार्यकारी संचालक संजीव देसाई, जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजीराव चव्हाण, कृषी सहायक अधिकारी श्रीमती हेमलता फडतरे, मधसंचालनालय महाबळेश्‍वरचे संचालक डी. आर. पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एन. एम. तांबोळी, संभाजी शेळके, दिलीप शेळके, संतोष कदम आदी उपस्थित होते.

मधसंचालनालय महाबळेश्‍वरचे संचालक डी. आर. पाटील यांनी प्रास्ताविकात मधमाशी पालन आणि त्याच्याशी निगडित शासकीय योजना याची सविस्तर माहिती दिली. शिबीरात मध योजना, शासकीय योजना, कृषी योजना, आत्मा योजना, निसर्गातील वसाहतींचे संकलन व संगोपन, मधाची गुणवत्ता व तपासणी याबाबतचे मार्गदर्शन आणि मधमाशा पालन याबाबत उपस्थित तज्ञ अधिकार्‍यांकडून माहिती देण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिबिरात सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक होता. संशोधन अधिकारी रघुनाथ नारायणकर यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप साळुंखे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!