दैनिक स्थैर्य | दि. १९ एप्रिल २०२३ | फलटण |
साखरवाडी नऊ सर्कल, तालुका फलटण गावच्या हद्दीत पूर्ववैमनस्यातून एका कुटुंबाला लोखंडी गजाने व दगडाने मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी तिघाजणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित विश्वास यादव, प्रमोद विश्वास यादव व मंगल विश्वास यादव (सर्व राहणार साखरवाडी नऊ सर्कल, तालुका फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, काल मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास साखरवाडी नऊ सर्कल, तालुका फलटण गावच्या हद्दीत आरोपी यांनी फिर्यादी प्रियंका महेश यादव (वय २४, राहणार साखरवाडी नऊ सर्कल, तालुका फलटण) यांचे घराचे समोर येऊन फिर्यादी या आंघोळ करून येत असताना यातील आरोपी रोहित विश्वास यादव याने मागील महिन्यापूर्वीचे झालेल्या भांडणाच्या कारणावरून पाठीमागून गजाने फिर्यादीच्या डोक्यात मारले व फिर्यादीचे सासरे बाळू श्रीरंग यादव हे भांडणे सोडवण्याकरीता आले असताना त्यांना रोहित यादव याने त्याचे हातातील लोखंडी गजाने मारून जखमी केले. तसेच आरोपी प्रमोद विश्वास यादव याने हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीचे दीर कुमार बाळू यादव यांना आरोपी मंगल विश्वास यादव हिने हातामध्ये दगड घेऊन कुमार यादव यांना मारून त्यांना गंभीर दुखापत केली व शिवीगाळ, दमदाटी केल्याची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी वरील तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार हंगे करत आहेत.