
दैनिक स्थैर्य | दि. १३ जुलै २०२३ | फलटण |
फलटण शहरातील फळ मार्केट येथे गाडी आडवी मारण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले असून त्यापैकी एकावर शहरातील निकोप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अक्षय चोरमले यांनी फलटण शहर पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी मारहाण करणार्या संशयित सातजणांवर गुन्हा नोंद केला आहे.
नोहेल शहाजी तांदळे, आदित्य विठ्ठल गुंजाळ, हर्षद रोहीदास नलवडे, रूपेश जाधव तसेच इतर तीन अनोळखी इसम (सर्व रा. मच्छी मार्केट, फलटण, ता. फलटण, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या घटनेची पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौकाचे पुढे फळ मार्केट, फलटण येथील किर्ती शू पॅलेसच्या समोर फिर्यादी व अनिकेत राजेंद्र चोरमले हे होंडा शाईन मोटारसायकल (क्र.एमएच-११-सीके-०६२२) या गाडीवर तसेच होंडा अॅक्टिव्हा स्कुटी मोटारसायकल (क्र. एमएच-११-सीसी-७७६४) वरून रणजित सुभाष ठोंबरे व गणेश रमेश चोरमले असे सर्वजण फळ मार्केट, फलटण येथे फळे आणण्यासाठी जात असताना समोरून नोहेल तांदळे याने काही एक कारण नसताना त्याच्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल गणेश चोरमले याचे मोटारसायकलीस आडवी मारून अंगावर धावून जाऊन शिवीगाळ, दमदाटी केली व मोबाईलवरून हर्षद रोहीदास नलवडे, आदित्य विठ्ठल गुंजाळ, रूपेश जाधव व इतर तीन जण (सर्व रा. मच्छी मार्केट, फलटण) यांना बोलावून घेतले. त्यातील हर्षद रोहीदास नलवडे याने फायटरने अनिकेत राजेंद्र चोरमले याचे डोक्यात मारले. यावेळी अनिकेत गंभीर जखमी झाला. तसेच नोहेल शहाजी तांदळे, आदित्य विठ्ठल गुंजाळ, हर्षल नलवडे, रूपेश जाधव तसेच इतर तीन अनोळखी इसम यांनी लाथाबुक्क्यांनी अनिकेतच्या पोटात, छातीवर मारले. गणेश चोरमले यास नोहेल शहाजी तांदळे व इतर तीन अनोळखी इसमांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादी अक्षय चोरमले यासही मारहाणीत जखमी केले असल्याची तक्रार फलटण शहर पोलिसात दाखल झाली आहे.
या प्रकरणी अधिक तपास म.पो.ना. बोबडे करत आहेत.