
दैनिक स्थैर्य | दि. ०९ नोव्हेंबर २०२१ | सातारा | उधारीवर नेलेल्या कपड्यांचे तीनशे रुपये परत मागितले म्हणून एकास वजनकाट्याच्या लोखंडी पट्ट्याने मारहाण करण्याची घटना सातारा येथील भाजी मंडई परिसरात घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला असून सुनील सदाशिव रासकर (पूर्ण पत्ता नाही) असे त्याचे नाव आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सातारा येथील प्रतापगंज पेठेतील राधिक चौक परिसरात राहणारे गुड्डू सीताराम गुप्ता (वय ३१, मूळ रा. राजस्थान) हे सेल्समन म्हणून काम करतात. त्यांच्याकडून सुनील रासकर याने कपडे खरेदी केल्यानंतर त्याची तीनशे रुपये देणे बाकी होते. रविवार, दि. ७ रोजी रासकर हा गुप्ता यांना भाजी मंडई परिसरात भेटला. यावेळी त्यांनी तीनशे रुपये देण्याची विनंती केली. याचा राग आल्यामुळे रासकर याने गुप्ता यांना शिवीगाळ करत त्यांचे डोके आणि हातावर लोखंडी प्लेटने मारहाण केली. यात गुप्ता जखमी झाले. दरम्यान, ही भांडणे सोडविण्यासाठी श्रीकांत कांबळे आले असता त्यांनाही रासकर याने दमदाटी केली आणि तुमच्याविरोधात पोलीस ठाण्यात सावकारीची तक्रार नोंदवेन, अशीही धमकी दिली.
या घटनेनंतर जखमी झालेल्या गुप्ता यांनी सुनील रासकर याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार भिसे हे करीत आहेत.