हातउसने दिलेले पैसे मागितले म्हणून मारहाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२१ । सातारा । हातउसने दिलेले पैसे मागितले म्हणून तिघांना मारहाण करुन जीव मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सातारा येथील सदरबझार परिसरात दि. 16 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हमीद कच्छी, मस्जीद कच्छी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अभय जयंतीलाल ओसवाल (वय 31, रा. प्लॉट नंबर 6, इम्पिरिया क्लासिक, सदरबझार, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे स्वत:चे ज्वेलरी शॉप आहे. अभय ओसवाल आणि संशयित हमीद सलीम कच्छी, मस्जीद सलीम कच्छी (रा. शनिवार चौक, सातारा) यांची ओळख आहे. दरम्यान, अभय यांनी हमीद यांना हातउसने पैसे दिले आहेत. ते पैसे परत मागितले म्हणून हमीद आणि मस्जीद या दोघांनी तक्रारदार तसेच त्यांचे वडील जयंतीलाल ओसवाल, पत्नी योगिता यांना हाताने धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी अभय ओसवाल यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हमीद कच्छी आणि मस्जीद कच्छी या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, घटनास्थळी सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी भेट दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!