दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२२ । सातारा । लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी….
मराठी राजभाषा दिनानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी, लेखक कुसुमाग्रज यांनी आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत खूप मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.
आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा २७ फेब्रुवारी जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
अनेक संतांनी मराठी भाषेतून विविध ग्रंथ साहित्य, भारुड, कथा लिहून प्राचीन काळापासून मराठी भाषा समृद्ध केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी देखील मराठी भाषेचं संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी खूप मोठं योगदान आणि प्रोत्साहन दिलं आहे.
माझा मराठीची बोलु कौतुके
परी अमृतातेही पैजासी जिंके
ऐसी अक्षरे रसिके.. मेळविन
संत ज्ञानेश्वरांनी ‘मराठी’ चा महिमा या ओवी मधून विशद केला आहे. मराठी भाषा अमृतालाही पैजेने जिंकणारी आहे. तिचा गोडवा अमृतापेक्षाही अधिक आहे, असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. देशामध्ये बोलल्या जाणाऱ्या २२ प्रमुख भाषांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची मराठी भाषा आहे. छत्रपती शिवरायांनी मराठी भाषा आणखी समृद्ध व्हावी म्हणून पहिला राजकोष तयार केला आणि या भाषेला राजाश्रय दिला.
मराठी भाषेचं संवर्धन व्हावं, तिचं महत्त्व भावी पिढ्यांमध्ये टिकून रहावं, यासाठी राज्य शासनाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येतात. नवोदित लेखक, कवी यांना मराठी साहित्याबद्दल आवड निर्माण व्हावी, स्फूर्ती यावी यासाठी शासनामार्फत अनेक पुरस्कार दिले जातात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई आणि मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह राज्य शासन मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अन्य क्षेत्रांच्या विकासाबरोबरच मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह अन्य मंत्री महोदय प्रयत्नशील आहेत. भिलारच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यातही लवकरच पुस्तकांचे गाव उभा करण्यात येणार आहे. अशा उपक्रमांमुळे वाचनसंस्कृतीला निश्चितच चालना मिळेल..
खऱ्या अर्थाने मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी प्रत्येकानं योगदान द्यायला हवं. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेच..!
मराठी ही खूप प्राचीन भाषा आहे. हजारो वर्षांपासून मराठी भाषा बोलली जात असल्याचे दाखले आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शासकीय कामकाज मराठी भाषेतून करण्यात येत आहे. शासकीय पत्रव्यवहार, आदेश, टिपणी हे सर्व मराठीतून केले जाते. राज्य शासनाच्या अन्य विभागांबरोबरच माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय हे मराठी भाषेचा प्रभावीपणे वापर करुन मराठीच्या गौरवात भर घालत आहे. कारण माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय हे प्रशासकीय कामकाजाबरोबरच शासनाच्या प्रसिद्धी विषयक सर्व बाबींमध्ये मराठीचा वापर उत्कृष्टपणे करते. मराठी भाषेतीलच नव्हे तर हिंदी आणि इंग्रजी भाषेतील कार्यक्रमांच्या बातम्या मराठी भाषेतून अचूकपणे आणि जलदगतीने सर्व प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचं काम माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालय करते. मराठी भाषेच्या गौरवात भर घालण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात.
मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी.. मराठी भाषेला महत्त्व मिळवून देण्यासाठी शासन आणि प्रशासन तर प्रयत्न करत आहेच.. पण यामध्ये आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. या कामी सर्वांचं योगदान आवश्यक आहे.
काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याकडं आपण सर्वांनी लक्ष द्यायला हवं.
एक म्हणजे– बऱ्याच जणांना मराठीमध्ये बोलणं कमीपणाचं वाटतं.. पण ही मानसिकता आपण सगळ्यांनी बदलायला हवी. आपल्या भाषेकडं बघण्याचा दृष्टिकोन आपणच बदलायला हवा. आपल्या मराठी भाषेला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. बोलताना किंवा लिहिताना मराठी भाषेचा वापर करताना आपण कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगायला नको.
दुसरं म्हणजे– केवळ कामकाजातच नाही तर दैनंदिन व्यवहारातही आपण मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करायला हवा.
जसं की वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना.. आपण happy birthday म्हणतो,
याऐवजी “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!” असं म्हटलं तर किती प्रेम आणि जवळीकता वाटते.. सध्या मोबाईल, व्हाट्सएपच्या संदेशात देखील good morning, good night, ok असे शब्दप्रयोग सर्रासपणे आपण करतो, याऐवजी आपण शुभ प्रभात, शुभ रात्री, ठीक आहे, हो.. असे शब्द वापरु शकतो, जेणेकरून आपल्या मराठी भाषेचा वापर वाढेल..
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दऱ्या-खोऱ्यातील शिळा…
या कुसुमाग्रजांच्या ओळी आपण सर्वांनी स्मरण करुन मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करुया…. !
हिंदी, इंग्रजी भाषेचं पूरेपूर ज्ञान घेऊन या भाषेमध्ये प्रभुत्व मिळवणं आवश्यकच आहे. पण हे करताना मराठी भाषेचं मनापासून कौतुक करुया…
मराठी म्हणजे अविट असा गोडवा..
मराठी म्हणजे प्रेम…
मराठी म्हणजे अभिमान..
मराठी म्हणजे शौर्य..
मराठी म्हणजे संस्कार..
मराठी म्हणजे आपुलकी..
आणि मराठी म्हणजे.. मराठी म्हणजे.. आपला महाराष्ट्र…!
मराठी राजभाषा दिनानिमित्त एवढंच सांगावंसं वाटतं, ते म्हणजे मराठीचं महत्त्व आणखी वाढण्यासाठी, मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुया.. आपल्या मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगुया..!
– वृषाली पाटील,
माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर