दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑक्टोबर २०२१ । फलटण । शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षातील नेते हे राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध घोटाळे करण्यासाठी “महाविकास आघाडी” या नावाखाली एकत्रित आलेले आहेत. महाविकास आघाडीच्या सरकार मधील नेत्यांना जर ED च्या चौकशीची भीती वाटत असेल तर त्यांनी नक्कीच काहीतरी घोटाळे केले असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या सरकार नेत्यांविरुद्ध नागरिकांनी माझ्याकडे किंवा आमच्या पक्षाकडे तक्रार केली अथवा त्याबाबतची माहिती दिली तर केंद्र सरकारच्या माध्यमातून नक्कीच घोटाळेबाजांचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत, असे सूचक विधान भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील “राजभवन” या निवासस्थानी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या बोलत होते. यावेळी फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले कि, महाविकास आघाडीच्या सरकार मधील नेत्यांनी राज्यामध्ये घोटाळे केलेले आहेत. हे घोटाळे बाहेर काढण्यासाठी आम्ही नेहमीच कार्यरत राहणार आहोत. आगामी काळामध्ये राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमधील बड्या नेत्यांना जर ED च्या चौकशीसाठी जावे लागले तर नक्कीच समजावे कि, त्या नेत्यांनी घोटाळे केलेले आहेत.
सहकारी कारखान्यांची पळवा पळवी करत पवार कुटुंबीय राज्यातील कारखाने हे प्रायव्हेट लिमिटेड करीत आहेत. जर ते असे करत नसतील तर जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण ? या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावे, असे आव्हान माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले. जरंडेश्वर कारखाना बंद पाडला जाणार असल्याचा अपप्रचार सुद्धा केला जात आहे, असेही यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.