झूम ॲप वापरताना सावध राहा : ‘महाराष्ट्र सायबर’चे नागरिकांना आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई दि.20 : सध्या अनेकजण घरुन काम (Work From Home) करत आहेत.ऑनलाईन मिटिंगसाठी वापरायला सोपे असल्याने झूम (zoom) या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे.सायबर भामट्यांनी झूम ॲप सदृश काही मालवेअर (malware) व खोटी ॲप बनवली आहेत. त्यामुळे हे ॲप वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’ने केले आहे.

आपल्या सहकाऱ्यांबरोबरच्या ऑनलाईन मिटिंगसाठी झूम, मायक्रोसॉफ्ट मीटिंग, स्काईप, सिस्को वेबेक्स (zoom ,microsoft meetings ,skype ,cisco webex) आदी सॉफ्टवेअर आणि ॲप्स वापरली जात आहेत. झूम त्यामध्ये वापरायला सोपे असल्याने  या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे .

सायबर भामट्यांनी बनविलेली झूम ॲप सदृश काही मालवेअर जर डाऊनलोड केली, तर तुमच्या सर्व मिटिंग रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते व तुमच्या मोबाईल किंवा संगणकाचा ताबादेखील हे सायबर भामटे घेऊ शकतात . ‘महाराष्ट्र सायबर’ने सर्व नागरिकांना विशेष करून झूम ॲप वापरणाऱ्यांना  हे ॲप वापरताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

झूम ॲप हे अधिकृत वेबसाईट किंवा प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करावे. शक्यतो कुठलीही गोपनीय माहिती अशा मिटिंगमध्ये बोलणे टाळावे किंवा संबंधित लोकांशी थेट बोलूनच त्यांना ही माहिती द्यावी . मिटिंग ॲडमिनने मिटिंगचे आयडी व पासवर्ड हे शक्यतो संबंधित व्यक्तींनाच थेट कळवावेत. तसेच सदर पासवर्ड हा थोडा क्लिष्ट ठेवावा जेणेकरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस तो समजण्यास कठीण जाईल. तसेच संबंधित मिटिंग ॲडमिन /होस्टने फक्त मिटिंगच्या विषयाच्या संबंधित व्यक्तींचीच लॉगिन रिक्वेस्ट स्वीकारावी.

पुढील बाबी लक्षात ठेवा

तुम्ही जर मीटिंग होस्ट असाल तर पुढील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे

१) तुम्हाला जो रँडम मिटींग आयडी व पासवर्ड मिळेल त्याचाच  शक्यतो वापर करा, तुमचा कुठलाही आयडी किंवा पासवर्ड वापरू नका .

२) तुम्ही मिटींग सेटिंग अशा प्रकारे बदल करा की तुमच्याशिवाय मिटींग मधील अन्य कोणीही व्यक्ती ती रेकॉर्ड करू शकणार नाही .

३) मिटींग मध्ये सर्व अपेक्षित व्यक्तींनी लॉगिन केल्यावर सदर मिटींग लॉक करा जेणेकरून अन्य कोणी व्यक्ती त्यात अनाहूतपणे लॉगिन करू शकणार नाही .

४) मिटिंग सेटिंग अशी करा की तुमच्या आधी व तुमच्या परवानगीशिवाय कोणी त्यात लॉगिन करू शकणार नाही.

५) तुम्ही जर काही कारणाने मिटींग सोडून जात असाल किंवा  मिटिंग संपली असेल तर लीव्ह मिटींग चा  पर्याय न वापरता एंड मिटींगचा पर्याय वापरा .

६) मिटिंगची लिंक आयडी व पासवर्ड ओपन फोरमवर शेअर करू नका.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!