खांदेकरी बरोबरीच बोलकरी व्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिवंत पणे अबोल धरणं. तुझं माझं करणे. भांडण तंटे हेवेदावे यातच जींदगी वाया जाते. जिवंतपणे काही काही माणसं ह्यातभार चकार शबूद बोलत नाहीत अन् गेल्यावर हंबरडा फोडतात. इचार करण्यासारखी गोष्ट आहे. मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे, त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो.आपण भावकीच्या अन् आपल्या मी पणासाठी खांदा देण्याच काम करतो.आपल मन आपल्यालाच खातं.

आपण किती ही मेलेल्या माणसांना खांदा दिला. यापेक्षा किती जिवंत माणसांना हात दिला यावर आपली माणुसकी ठरत असते. माणूस मेलेला कळताच धाऊन जाणारी माणसे तो जिवंत असताना, अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत? कसा अडचणीत सापडला.याची वाट बघतात.आला का नाही माझ्या दारात नाक घासत.आपण भी काही कमी नाय.पठ्याने शेवटपर्यंत खरंच करुन दाखवलं.

खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते.कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला ठेवणार नाहीत. पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत. खरतर आजकालच्या या खोट्या दिखाव्याच्या शर्यतीत, तू मोठा की मी मोठा ही क्षणभंगुर श्रीमंती दाखविण्यासाठी माणूस माणसाला, आपल्या नात्याला विसरत चाललाय. रक्ताची नाती कमकुवत होत आहेत.स्वार्थ वाढला आहे.बोलणं सुद्धा कुचकं ठसक्यात तिढ्यात टिंगल टवाळीत असतं.जणू आता माझ्या तावडीतच सापडला आहे.

जिवंतपणी, जिवंत माणसासाठी, जिवंत असणाऱ्या व अडचणीत सापडलेल्या, एखाद्याला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या. झालं गेलं विसरून,
तुझं माझं सोडून माणूस व्हा. मरेपर्यंत त्याचा अभिमान वाटेल.खांदा देणं महत्त्वाचे आहेच. पण माणुसकी जपली पाहिजे.कोरोनाने खांदा देणं हे भी हिरावून घेतलं.आपलं तुपलं करण्यातच आविष्याची वाट लागते.येळीच सावरुन मनातील आसूया काढून टाकून मनमोकळ्या रितीने बोलाचाली करणंच इष्ट आहे.

आपण सारेच या भूईचक्रातून निघालोय.आपलच वागणं बोलणं ही भावी पिढी बघत असते.याचा दूरगामी परिणाम होतोच.जिवंतपणी बोलावं भाडावं हसावं पण आबोलपण सोडून द्यावं.भल्या भल्यांचे या पायी देवं भंडारलं. पण पिळं कायमच राह्यालं.काय बरोबर नेलं.ज्याच त्यानं ठरवावं.खांद्याला खांदा देऊन पुढं जाऊ.विचाराची देवाण घेवाण करु.चला तर पितृ पंधराव्याड्यात हे ही पुण्याई पदरात घेऊ.

आपलाच बोलकरी – प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!