दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२२ । फलटण । कोळकी पंचायच समिती गणातील प्रामुख्याने आरोग्य, पाणी, रस्ते, शिक्षण आदी नागरी सुविधा आणि शेतीसाठी पाणी व वीज या मुलभूत समस्या असून त्यांची सोडवणूक आगामी काळात प्राधान्याने करण्याची ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यात संवाद यात्रेचा शुभारंभ शनिवार दि. १७ रोजी दुधेबावी, ता. फलटण येथून करण्यात आला असून तालुक्यातील विविध ठिकाणच्या सभा बैठकांद्वारे संपूर्ण वातावरण ढवळून काढून उद्या रविवार दि. १८ रोजी सायंकाळी गजानन चौक, फलटण येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. दुधेबावी येथे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे होते. यावेळी पंचायत समिती माजी सदस्य सुभाषराव सोनवलकर, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, लोकनियुक्त सरपंच मधुकर वावरे, फलटण नगर परिषद माजी विरोधी पक्ष गट नेते अशोकराव जाधव, नानासाहेब खडके, उत्तम सोनवलकर, माजी सरपंच त्रिंबकराव सोनवलकर, माजी चेअरमन गोपाळराव सोनवलकर, सचिन चांगण, दुधेबावी तिरकवाडी कोळकी झिरपवाडी भाडळी वडले वगैरे गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
भारतीय जनता पक्ष माध्यमातून दि. १७ सप्टेंबर राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि दि. २ ऑक्टोंबर राष्ट्रपिता म. गांधी जयंती या कालावधीत देशभर सेवा पंधरवडा राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्हा भाजपने जिल्हास्तरीय संवाद यात्रेचे आयोजन केले असून जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती गण निहाय खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे व अन्य पदाधिकारी सर्वसामान्यांच्या भेटी घेऊन आणि जाहीर सभांद्वारे प्रश्नांची माहिती घेऊन त्याची सोडवणूक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्र व राज्य शासन भारतीय जनता पक्षाचे असल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात कसलीच अडचण नसल्याचे स्पष्ट करतानाच आगामी काळात नीरा – देवघर आणि धोम – बलकवडी धरणांच्या कालव्यांची प्रलंबीत कामे प्राधान्याने पूर्ण करुन लाभ क्षेत्रातील जमिनीला पाणी उपलब्ध करुन देण्याबरोबर माळशिरस तालुक्यालाही नीरा – देवघरचे पाणी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.
सलग २०/२५ वर्षे अनिर्बंध सत्ता मिळूनही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या तालुक्यातील वीज, पाणी, आरोग्य, रस्ते, शिक्षण यासारख्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक केली नाही, केवळ लोकांना झुलवत ठेवल्याचा आरोप करीत आता केंद्र व राज्य शासन दोन्ही आपली आहेत, लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांची प्राधान्याने सोडवणूक करण्याची त्यांची धारणा आहे आणि या भागाच्या समस्या मांडून सोडवून घेण्याची क्षमता असलेले आम्ही लोकप्रतिनिधी आता तुमचे सर्व प्रश्न सोडविणार एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही याची ग्वाही भाजपा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी यावेळी दिली.
राजकीय सत्ता केंद्र व राज्य दोन्ही ठिकाणी असल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील आहोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात कोरोना लस, वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करुन दिली आहे, शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार त्यांच्या खात्यावर जमा होत आहेत आगामी काळात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आम्ही आपल्यासोबत आहोत, कसलीही चिंता करु नका फक्त आता पुन्हा सत्ता देताना कोण आपला याचा विचार नक्की करा असे आवाहन आ. जयकुमार गोरे यांनी केले.
दुधेबावी गावातील मारुतीच्या मंदिरा पाठीमागून धोम – बलकवडी धरणाचा कालवा काढून वडले, तिरकवाडी सह दुधेबावीच्या उर्वरित क्षेत्राला पाणी द्या, गावातील सर्व ओढ्यातून पाणी आले पाहिजे, भाडळी, तिरकवाडी, कोळकी, झिरपवाडी गावातील शेती पंपांना योग्य दाबाने अखंडित वीज पुरवठा मिळण्यासाठी, शेती पंपाची प्रलंबीत वीज जोडणी लगेच मिळण्यासाठी या भागात वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून डी. पी. (ट्रान्सफॉर्मर) ची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली, तिरकवाडी ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी केली खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या सर्व प्रकारच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करुन या सर्व प्रश्नांची सोडवणूक तातडीने करण्याची ग्वाही दिली.
नानासाहेब आडके यांनी सभेचे सुत्रसंचालन आणि समारोप व आभार उत्तम सोनवलकर यांनी मानले.