बारामतीच्या वरदा कुलकर्णीची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी; पटकावले रजत पदक


स्थैर्य, बारामती, दि. ०९ ऑगस्ट : बारामती येथील वीर सावरकर स्वीमर्स क्लबची खेळाडू वरदा संतोष कुलकर्णी हिने मुंबई येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक भारत राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत फ्री स्टाईल प्रकारात रजत पदक पटकावले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही राष्ट्रीय स्पर्धा दि. ३ ते ६ ऑगस्ट दरम्यान कांदिवली, मुंबई येथे पार पडली. देशभरातील विविध राज्यांतील खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून केवळ चार मुलींची निवड झाली होती, ज्यामध्ये वरदाने पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.

ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थिनी असलेल्या वरदाने चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. यापूर्वीही तिने पणजी आणि कर्नाटक येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. तिच्या या यशामध्ये प्रशिक्षक ओम सावळेपाटील आणि मार्गदर्शक इरफान तांबोळी व सुभाष बर्गे यांचे मोलाचे योगदान आहे.

या यशाबद्दल वीर सावरकर जलतरण तलावाचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, सचिव विश्वास शेळके, खजिनदार मिलिंद अत्रे, सल्लागार सदाशिव सातव आणि जवाहर वाघोलीकर यांनी तिचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!