दैनिक स्थैर्य । दि. २६ मार्च २०२२ । फलटण । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी बारामती ते फलटण हा मार्ग संपुर्ण चौपदरीकरणाच्या कामास मंजुरी दिलेली आहे. ना. नितिन गडकरी यांनी सुमारे सातशे ऐंशी कोटींचा निधी या मार्गासाठी मंजूर केलेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न करून सदरील निधी हा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मंजूर करून आणलेला आहे. बारामती ते फलटण या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हे फक्त आणि फक्त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे झालेले आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.
केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक, परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने दि.२१ मार्चच्या पत्राने सदर कामासाठी ७७८.१८ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे संपूर्ण पत्रव्यवहार केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी केले असून ह्या कामा संदर्भात फलटण मधील कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये कारण माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक रस्ते व विकास कामे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मार्गी लावलेले आहेत असेही जयकुमार शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.