
दैनिक स्थैर्य । 2 ऑगस्ट 2025 । सातारा। गतवर्षी सुमारे 24 दिवस गणपती बाप्पांची आगमन मिरवणूक निघाल्याने त्यात वाद झाल्याने यंदा केवळ दि. 16 व 23 ऑगस्ट या दोन दिवसांचीच आगमन मिरवणुकीला परवानगी राहील. इतरवेळी आगमन मिरवणूक निघाली व त्याबाबत तक्रार आल्यास गुन्हे दाखल केले जातील. तसेच डॉल्बीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत त्याचे सर्वांनी पालन करावे, अशा सूचना पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केल्या. दरम्यान, एमएसईबीच्या अधिकार्याला सर्वच गणेश भक्तांनी धारेवर धरले.
येथील शाहू कलामंदिर येथे गणेशोत्सव 2025 बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मल्लिार्जुन माने, डीवायएसपी राजीव नवले, मुख्याधिकारी अभिजीत बापट, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोनि सचिन म्हेत्रे, सपोनि अभिजीत यादव उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, गणपती ही बुध्दीदेवता आहे. निर्विघ्नपणे हा उत्सव पार पडावा, यासाठी पोलिस दल सदैव तत्पर आहे. एक खिडकी योजनेसाठी पोलिस अधिकारी नक्की दिला जाईल. डॉल्बीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्या आदेशाचे सर्वांनीपालन करावे. चौपाटी रात्री 2 वाजेपर्यंत सुरु राहील. मात्र भांडणे झाल्यास ती तत्काळ बंद केली जाईल. आगमन सोहळ्यात भक्तीगीते, भजन, किर्तन असावीत. पोलिस नियमानुसार आगमन सोहळ्याला पोलिस परवानगी देत नाहीत. गतवर्षीचा अनुभव पाहता दोन शनिवार यामध्ये दि. 16 व 23 आगॅस्ट रोजी आगमन मिरवणूक घ्यावी. त्यावेळी वाहतूक सुरळीत रहावी. आवाजाचे उल्लंघन होणार नाही याची मंडळांनी खबरदारी घ्यावी. दोन दिवसांशिवाय इतरवेळी आगमन मिरवणूक निघाल्यास व त्याबाबत तक्रारी आल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा तुषार दोशी यांनी दिला.
दरम्यान, सुरुवातीला गणेश मंडळाच्या पदाधिकारी, गणेश भक्तांनी अडचणी मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरु करावी, एमएसईबीकडून डिपॉझिट मिळत नाही. एमएसईबीचे वीज दर संशोधनाचा विषय असून दराबाबत माहिती मिळावी. आगमन तारखा जास्त असाव्यात. डॉल्बीसाठी 2 बेस व टॉप ऐवजी 4 बेस व टॉपला परवागी मिळावी. रस्त्यावरील खड्डे तत्काळ मुजवावेत. सातार्यात सर्वत्र सीसीटीव्ही बसवावेत. सातव्या दिवशी विसर्जन होणार्या मंडळांना पालिकेचे सहकार्य मिळत नाही, असेअनेक मुद्दे मांडण्यात आले. हे सर्व मुद्दे गणेशभक्त नरेंद्र पाटील, अशोक मोने, पंकज चव्हाण, श्रीकांत शेटे, चंद्रशेखर घोरपडे, सुनील काळेकर, महेश साळुंखे, अभिजीत बारटक्के, प्रतिक शिंदे, सागर पावशे, रोहित किर्दत, धनंजय शिंदे, हरिदास जगदाळे, अक्षय गवळी यांनी मांडले.
गणेशभक्तांच्या प्रश्नांना उत्तर देताना एमएसईबीच्यावतीने नवाळे यांनी यावर्षी एका दिवसात वीज कनेक्शन दिले जाईल, असे सांगितले. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सुरुवातीला गणेश उत्सव कालावधीत एकूण खर्च किती होतो याची सविस्तर माहिती दिली.
बैठकीत गणेश मंडळांनी सूचनांचा पाऊस पाडला. यामध्ये प्रामुख्याने एमएसईबीच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला. वीज कनेक्शन देताना दरवर्षी डिपॉझिट घेतले जाते मात्र ती रक्कम परत मिळतच नाही अशी तक्रार करण्यात आली. यावर उत्तर देताना एमएसईबीच्या अधिकार्यांचे अक्षरशः त त..फ फ झाले. अशा सणावेळी रिलीजस दर हा 8 ते 9 रुपये प्रति युनिट लावला जातो, असे सांगताच गणेशभक्त आक्रमक झाले. आम्हाला 15 रुपयांप्रमाणे वीज बिल दिली गेली असल्याचे मंडळाच्या पदाधिकार्यांनी सांगितले. वीज बिलासाठी एमएसईबीकडून लुटमार केली जात असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. कनेक्शन सिंगल की थ्री फेज याचीही माहिती देताना अधिकार्यांची दमछाक झाली. अखेर पोलिस अधीक्षक यांनी मध्यस्थी करत पोलिस अधिकार्यांच्या उपस्थित गणेशभक्त समन्वयकांची वीज दराबाबत स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असे सांगितले.
पालिकेमध्ये एक खिडकी योजना सुरु केली जाईल. सातव्या दिवशी विसर्जन होणार्या मंडळांना पालिकेकडून सर्व सुविधा पुरवल्या जातील. त्यासाठीसंबंधित मंडळांनी अगोदर माहिती द्यावी. सातारा पालिकेची वेबसाईट असून तत्काळ ऑनलाईन परवानगी दिली जाईल.