
स्थैर्य, फलटण, दि. १० ऑक्टोबर : फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राजे गटाकडून अनिकेतराजे नाईक निंबाळकर हेच उमेदवार असतील, यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. शहराच्या सीमेवर जिंती नाका येथे त्यांच्या नावाने मोठे बॅनर झळकले असून, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना मोठे बळ मिळाले आहे.
‘आरंभ नवपर्वाचा’ आणि ‘राजतिलक की करो तयारी’ अशा टॅगलाईन असलेले हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण खुले झाल्यापासून राजे गटाकडून अनिकेतराजे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. सोशल मीडियावरही त्यांच्या नावाने प्रचार सुरू झाला होता. आता प्रत्यक्ष बॅनर लागल्याने, राजे गटाने उमेदवारी निश्चित केल्याचे हे संकेत मानले जात आहेत.
या बॅनरबाजीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, आता महायुतीकडून कोणता उमेदवार दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.