
स्थैर्य, सोलापूर, दि.2 : सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका आपल्या सर्व बँकिंग सुविधासह नियमित वेळेत सुरू राहतील, तर कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील बँका 30 जून पर्यंत पूर्णपणे बंद राहतील, असे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. बी. सोनवणे यांनी सांगितले.
शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यस्तरीय बँकर्स समितीने दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील बँकांच्या कामकाजाची सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, कंटेनमेंट झोनमधील शाखा 30 जून पर्यंत पूर्णता बंद राहतील. कंटेनमेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील सर्व बँकिंग सुविधा नियमित वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहतील. व्यावसायिक क्षेत्र बँका सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत सुरु राहतील. निवासी क्षेत्र बँका सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत तर इतर क्षेत्रातील बँका सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहतील, असे श्री सोनवणे यांनी कळविले आहे.