शेतकर्‍यांना अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी बँकांनी तातडीने वित्त पुरवठा करावा

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश


स्थैर्य, फलटण, दि. 11 डिसेंबर : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत उद्योग उभारणीसाठी शेतकर्‍यांकडून आलेल्या प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय घेऊन मंजुरी द्यावी. मंजूर प्रस्तावानुसार शेतकर्‍यांना उद्योग उभारणीसाठी बँकांनी तातडीने वित्त पुरवठा करावा. वित्त पुरवठ्याची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत सुरु झालेल्या कृषी उद्योगांची पाहणी करावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, या उद्योगांच्या यशकथा समाज माध्यमांवर प्रसिद्ध कराव्यात, यामुळे योजनेची इतर शेतकर्‍यांना माहिती होण्याबरोबर उद्योजक शेतकर्‍याला लाभ होईल.

कांदाटी खोरे एकात्मिक विकास प्रकल्पाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, कांदाटी खोर्‍यातील 16 गावांमधील शेतकर्‍यांना मधमाशी पालनासाठी प्रोत्साहित करावे. त्यांना मधमाशी पालनासाठी लागणार्‍या पेट्या सीएसआर फंडातून देण्यात येतील. कांदाटी खोर्‍यात पर्यटन वाढीसाठीही प्रयत्न करण्यात येत आहे. येथील ज्या कुटुंबांना घरकुल योजना मंजूर झाली आहे त्यांची यादी द्यावी, घरकुल मंजुर झालेल्या कुटुंबाला होम स्टे योजनेअंतर्गत एक खोली काढण्यासाठी सीएसआर फंडतून मदत केली जाईल. तसेच पर्यटकांसाठी होम स्टेच्या माध्यमातून इतर सुविधा वाढवण्यात येतील. त्याचबरोबर कृषी विभागाने पर्यटन व्यवसायिकांशी संपर्क साधून या भागात सहलींचे नियोजन करावे, यामुळे तेथील व्यवसाय वाढण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.

खटाव तालुक्यातील सुर्याचीवाडी या गावाचा आदर्श गाव योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. येथील मंजूर कामे येत्या 31 मार्च पर्यंत पूर्ण करावीत. तसेच येथील नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी त्यांच्या उद्योग व्यवसायाला कृषी विभागाने मदत करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केल.


Back to top button
Don`t copy text!