खरीप पिक कर्जवाटपाला बँकांनी गती द्यावी – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नागपूर, दि. १६: खरीप पीक कर्ज वाटपाची टक्केवारी कमी असून बँकांनी कर्ज वाटपाला गती देण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. छत्रपती सभागृहात आयोजित खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा उपनिबंधक अजय कडू, अग्रणी बँक व्यवस्थापक पंकज देशमुख, खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जून महिना उजाडला असून खरीपाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. कर्जवाटपाच्या धिम्या गतीबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. कोविडशी झुंजत असतांना शेती व शेतकऱ्यांच्या आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात 1 लाख 8 हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचा लक्षांक असताना आतापर्यंत फक्त 15002 सभासदांना 169 कोटी 43 लाख कर्ज वाटप झाल्याचे दिसून येते. हे प्रमाण 16 टक्के असून कमी असल्याने त्यांनी असमाधान व्यक्त केले.

कर्जवाटपाला गतीमान करण्यासाठी गाव पातळीवर सभा आयोजित कराव्यात. जिल्हा तसेच तालुका पातळीवर व बँकस्तरावर कॅम्प आयोजित करण्यात यावेत. पात्र खातेदारांना सभासद करून घ्यावे व अशा सभासदांना कर्ज वाटप करण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे श्री. राऊत यांनी सांगितले.

यावेळी बँकनिहाय कर्जवाटपाच्या टक्केवारीची माहिती घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्याचे त्यांनी निर्देशित केले. शिवाजी महाराज कर्जमाफी योजना व महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनांच्या माध्यमातून अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. तरी देखील जे शेतकरी कर्ज घेण्यास पात्र आहेत त्यांच्यापर्यत खरीप पीक कर्ज नियोजनाने वाटप करण्यात यावे. अडीअडचणी सोडविण्यासाठी टोल फ्री नंबर सुद्धा प्रसिद्ध करण्याचे निर्देश त्यांनी सहकार विभागाला दिले.

शेतकऱ्यांना सावकारी पाशातून सुटका होण्यासाठी व बँक स्तरावर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. वेळेत मिळालेले पीक कर्ज हे शेतकऱ्यांसाठी संजीवनीच असते. गेल्या वर्षी सुद्धा नागपूर जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटप चांगली कामगिरी करण्यात आली होती. यावर्षी कोरोना प्रतिबंधात्मक परिस्थितीमुळे मेळावे आयोजित करण्यावर मर्यादा होती, मात्र आता निर्बध शिथील झाल्यानंतर कोविड त्रिसूत्रीचे पालन करत बँकांनी क्षेत्रीय पातळीवर उतरून शेतकऱ्यांशी संपर्क करावा. जिल्हा मध्यवर्ती बँक, ग्रामीण बँक आणि राष्ट्रीयीकृत बँक यांनी सामूहिकपणे लक्षांक गाठण्यासाठी प्रयत्न करावेत असे पालकमंत्र्यांनी निर्देशित केले. गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर पीक कर्ज मेळावे घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे अशी देखील सूचना त्यांनी यावेळी केली.


Back to top button
Don`t copy text!