बँकांनी स्वयंसहाय्यता समुहांना संवेदनशीलता ठेऊन आर्थिक पाठबळ द्यावे – डॉ.हेमंत वसेकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । मुंबई । सर्व बँकर्सनी ग्रामीण भागातील बचतगटांना कर्ज वितरण करताना संवेदनशील दृष्टीकोन ठेवायला हवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी केले.

नवी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या राज्य कक्षातर्फे राज्यातील सर्व सार्वजनिक, खाजगी व सहकारी क्षेत्रातील बँकर्सच्या राज्यस्तरीय प्रमुखांच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राज्यातील स्वयंसहायता समूहांना योग्यवेळी पतपुरवठा उपलब्ध करणे, खाते उघडणे, समूह सदस्यांना विमा सुरक्षा कवच उपलब्ध करणे हे विषय कार्यशाळेत चर्चिले गेले.

राज्यातील सर्व बँकर्स सोबत आयोजित चर्चासंवादात बँकांनी केलेल्या कामगिरीबाबत बँकनिहाय आढावा घेण्यात आला. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांनी सादरीकरण केले. रिझर्व बँकेच्या निर्देशांप्रमाणे बँकांनी प्राधान्य क्षेत्राला पतपुरवठा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे वंचित घटकांना उपजिविकेची साधने उपलब्ध होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रत्येक बँकेची उद्दिष्ट व साध्य, बँकांचा प्रादेशिक विभागनिहाय दृष्टीकोन, भविष्यातील नियोजन आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांसाठी प्रोत्साहन कार्यक्रम याविषयीची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

एचडीएफसी बँकेने पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल बँकेला अभियानाकडून गौरविण्यात आले. एचडीएफसी बँकेने त्यांनी अंगिकारलेल्या कार्यपद्धतीबद्दल अन्य बँक प्रमुखांना माहिती देण्यात आली.

याच कार्यशाळेत बँक ऑफ इंडियासोबत ग्रामीण बचत गटांना अल्पदराने पतपुरवठा करण्याबाबत सामंजस्य करारही करण्यात आला. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्यावतीने राजेश देशमुख यांनी राज्यातील सर्व बँका महिला स्वयंसहायता समुहांना सर्वप्रकारे सकारात्मक मदत करतील व महाराष्ट्र देशात सर्वात पुढे राहील यासाठी प्रयत्न करतील, असे प्रतिपादन केले.

राज्यातील सर्व प्रमुख बँकांचे अधिकारी प्रतिनिधी, अभियानाचे उपसंचालक डॉ.राजेश जोगदंड, अभियान व्यवस्थापक श्रीमती कावेरी पवार यावेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!