दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२१ । सातारा । रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक बँक शाखांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी गाव निहाय शिबीरांचे आयोजन करण्याची सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अग्रणी बँक सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुषमा देसाई, बँक ऑफ महाराष्ट्र अंचल प्रबंधक अपर्णा जोगळेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील, रिझर्व्ह बँकेचे नरेंद्र कोकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विकासासाठी कृषी, उद्योग, शैक्षणिक यासह विविध कर्ज प्रकरणे लवकरात लवकर मंजूर करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सह पिक कर्ज उपलब्ध होण्यासाठी गावनिहाय शिबीरांचे आयोजन करावे. जिल्ह्यात उद्योग निर्माण व्हावेत यासाठी बँकांकडील विविध योजनांची प्रकरणे पडताळणी करुन मंजूर करावीत. तसेच अनुसूचित जाती करिता असलेल्या स्टॅड अप इंडिया योजनेंतर्गत तालुकानिहाय प्रकरणे मंजूर करावी.
जिल्ह्यातील महिला बचत गटांना उद्योग उभारणीसाठी चांगल्या प्रकारे कर्ज वाटप झाले आहेत. महिला बचत गटांच्या बँक खाती उघडण्यासाठी बँकांनी बचत गटांना सहाय्यता करावी. तसेच महामंडळाकडील विविध योजनांची कर्ज प्रकरणे आहेत तेही बँकांनी लवकरात लवकर मंजुर करावीत, अशाही सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
यावेळी पीक कर्ज वाटपामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या बँक प्रतिनिधींचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.