दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२२ । सातारा । जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली. प्रत्येक बँक शाखा निहाय खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करावे, असे निर्देश दिले.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक राजेंद्र चौधरी, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक विवेक नाचणे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक युवराज पाटील यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्ज प्रकरणांमध्ये अडचणी येत असतील तर त्याची माहिती कृषी विभागाने घेऊन त्यांना सुलभरित्या कर्ज कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. लघु उद्योजकांची कर्ज रक्कमेची मोठी मागणी नसते. त्यांच्या मागणीनुसार जास्तीत जास्त लघु उद्योजकांचे कर्ज प्रकरणे मंजूर करावीत. याबरोबरच बचत गटांची कर्ज प्रकरणेही जास्तीत जास्त मंजूर करावीत, असे निर्देशही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.