
दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२१ । सातारा । खासगीकरणाच्या धोरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सातारा जिल्ह्यातील बँका सहभागी झाल्या असून, शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही बँकांचे सर्व व्यवहार ठप्प होते. एकीकडे बँका बंद तर दुसरीकडे एटीएममध्ये खडखडाट झाल्याने नागरिकांना अनेक अडचणी निर्माण झाल्या.
बँकिंग कायदा सुधारणा विधेयक २०२१ व सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने दि. १६ व १७ डिसेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला सातारा जिल्ह्यातील बँकांनी कामकाज बंद ठेवून पाठिंबा दर्शविला आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ही जिल्ह्यातील बहुतांश बँकांचे शटर बंद होते. काही बँकांच्या बाहेर बंदचे फलकही लावण्यात आले होते. शहरी भागातील नागरिकांना संपाची कल्पना होती. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना कोणतीच माहिती नसल्याने कामकाजा निमित्त आलेल्या ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, बँकांच्या संपामुळे गेल्या दोन दिवसांपासून सर्व आर्थिक व्यवहार व बँकांशी निगडित कामे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली शहरातील एटीएम सेंटरच्या बाहेर नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. काही एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांची धावपळ उडाली. शनिवारी काही बँकांना सुट्टी आहे तर रविवारी विकेंडमुळे सुट्टी राहणार आहे. त्यामुळे आणखीन दोन दिवस नागरिकांना अडचणीचे जाणार आहेत. बँकिंग संबंधित कामे उरकण्यासाठी आता नागरिकांना सोमवारची वाट पहावी लागणार आहे.