
दैनिक स्थैर्य । दि.२९ मार्च २०२२ । सातारा । मार्च एंडिंगची कामे खोळंबलेली असताना अचानक बँक कर्मचारी संघटनांनी दोन दिवसांचा संप पुकारल्याने साताऱ्यात बँकिंग सेवा खोळंबली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅकांचे खाजगीकरण व बॅक दुरुस्ती विधेयक 2021 च्या विरोधात ऑल इंडिया बॅक एम्प्लॉईज युनियन च्या आदेशाने देश पातळीवर बॅक कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. या दोन दिवसाच्या संपाने जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. काही राष्ट्रीयकृत बॅका वगळता सोमवारी बॅकिंग सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. मार्च एंडची गडबड निर्णायक टप्प्यात असताना बॅक संपामुळे नोकरदारांना प्रिमियम भरण्यात प्रचंड अडचणी येत होत्या.
मार्च एंडचे केवळ तीनच दिवस उरल्याने व्यापारी विक्रेते नोकरदार यांची प्रचंड धावपळ सुरु आहे. केंद्र शासनाने बॅकिग खाजगीकरणाचा घेतलेला निर्णय अहिताचा आहे असे जाहीर करून ऑल इंडिया बॅक एम्प्लॉईज असोसिएशन च्या आदेशाने सुमारे साडेसहाशे कर्मचारी साताऱ्यात या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र बॅकांनी एटीएम सेवा व ईपास बुक सेवा जय्यत ठेवल्याने नागरिकांची अडचण होणार नाही याची ग्वाही सातारा एम्प्लॉईज असोसिएशनच्या विवेक जोशी यांनी सांगितले. मात्र क्लिअरिंग हाऊसेस बंद राहिल्याने धनादेश व्यवहार ठप्प होऊन दोन दिवसात पन्नास कोटीचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. एसबीआयने ग्राहकांना या दोन दिवसीय संपासाठी अलर्ट केले होते मात्र एसबीआय वगळता सर्व राष्ट्रीयकृत बॅकांनी खाजगीकरणाच्या धोरणाचा निषेध करत कामकाज बंद ठेवले.
शेअर मार्केटलाही या संपाचा फरका बसला आहे. एकस्चेंज हाऊसेस बंद राहिल्याने जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना ताजे विनिमय दर समजू शकले नाहीत. म्युच्युअल फंड व निफ्टी मार्केट सुद्धा थंडच राहिले . मात्र बुधवारी पुन्हा बँकांचे जेव्हा पुन्हा कामकाज सुरु होईल तेव्हा कामाचा प्रचंड ताण राहणार आहे.