दैनिक स्थैर्य | दि. 16 जुलै 2024 | फलटण | अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य गरजू व्यक्तींना व्यवसाय उभे करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून कर्ज करून देण्यात येते. याबाबत फलटण येथे काही बँका मुद्दामून महामंडळाच्या कर्जाची वाटप करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. याच अनुषंगाने फलटण मधील सर्व बँकेचे प्रमुख अधिकारी व शासनाचे अधिकारी यांची बैठक मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये फलटणमध्ये घेणार आहे; अशी माहिती अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी दिली.
फलटण येथे पत्रकारांशी बोलताना ना. नरेंद्र पाटील बोलत होते.
खुल्या प्रवर्गातील सर्वसामान्य युवकाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कमी व्याजदरांमध्ये कर्ज प्रकरण करून देण्यात येते. अशांमध्येच काही बँका मुद्दामून अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज प्रकरण करण्यासाठी अनुकूल दिसून येत नाहीत. या संदर्भातच फलटणचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार व फलटण येथील बँकांचे विभागीय अधिकारी व शाखाधिकारी यांची संयुक्तिक बैठक येणाऱ्या काही दिवसांमध्ये लावणार असून त्यामध्ये सर्व बँकांना निर्देश देण्यात येणार आहेत; असे सुद्धा यावेळी ना. पाटील यांनी स्पष्ट केले.