दैनिक स्थैर्य । दि. १२ डिसेंबर २०२२ । सातारा । रुबिना मुजावर एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली एक साधीसरळ मुलगी. आई आणि वडील दोघेही शिक्षित असल्याने घरामध्ये शिक्षणाला महत्व होतेच, त्याचबरोबर वडील आर्मी मध्ये सैनिक असल्याने घरात शिस्तप्रिय वातावरण होते. वडिलांच्या आर्मी नोकरीच्या निमित्ताने त्यांचे बालपण हे मुंबई, नागपूर, जम्मू इ. भागात गेले. एक गोष्ट रुबिना खूप अभिमानाने किंबहुना गर्वाने सांगतात ‘त्यांच्या वडिलांनी कारगिल युद्धामध्ये शत्रुसैनिकांशी भिडताना शौर्य गाजवले आहे’. अशा शूरवीर वडिलांची ही लाडकी लेक. उच्च शिक्षणाची इच्छा असतानाही काही कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना त्यांचे शिक्षण बारावी पर्यंतच मर्यादित ठेवावे लागले. त्यांचे कुटुंब सातारा जिल्ह्यातील गजवडी या गावी स्थायिक झाले होते. पुढे लग्नानंतर रुबिना इनामदार या रुबिना इम्रान मुजावर झाल्या.
सासरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती, त्यांचे पती एक वाहन चालक आहेत. पुढे कुटुंबात २ लहानग्यांच्या आगमन झाले. कमावता व्यक्ती एक व खाणारी तोंडे अनेक असल्यामुळे उत्पन्न व खर्चाचा मेळ बिघडत गेला आणि आर्थिक चणचण प्रकर्षाने जाणवू लागली. अशावेळी रुबिना यांनी घराबाहेर पडून कुटुंबाला हातभार लावण्याचा निर्णय घेतला. खरे तर एका पारंपारिक रूढीवादी कुटुंबातील असल्याने त्यांना घरातून थोडा विरोध झाला, परंतु पतीच्या खंबीर साथीमुळे त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. या अशा परिस्थितीमध्ये एका परिचितांकडून त्यांना उमेद अभियानातील ‘बँक सखी’ या पदाच्या जाहिरातीबद्दल माहिती मिळाली. यथावकाश परीक्षेचे सर्व टप्पे पूर्ण करून रुबिना मुजावर या बँक सखी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र, परळी, जि. सातारा या ठिकाणी रोजी रुजू झाल्या.
आता रुबिना या परळी खोऱ्यातील उमेद परिवाराच्या ‘बँकवाल्या मॅडम’ बनल्या आहेत. उमेद अभियानातील परळी खोऱ्यातील बाकी केडरसोबत मिळून त्या खूप उल्लेखनीय काम करत आहेत. रुबिना यांची कामाची पद्धत खूप उल्लेखनीय आहे. कारी ता. सातारा प्रभागातील ज्या ज्या गावामध्ये आपले उमेद चे समूह आहेत, त्या गावातील महिलांशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. त्यांनी सर्व समूहातील सदस्यांना त्यांचा नंबर दिलेला आहे, जेणेकरून ज्या सदस्याचे बँकेत काही काम असेल त्याने येण्याअगोदर रुबिना मॅडम यांना फोन करून कामाच्या स्वरूपाबद्दल सांगावे, त्या प्रमाणे रुबिना या त्यांच्या कामाची विभागणी करतात जेणेकरून समूहातील सदस्यांचे बँकेतील काम एका भेटीत व झटपट होईल. एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, चाळकेवाडी गावामध्ये त्यांनी बँकेच्या सहकार्यातून एक छोटा बँक मेळावा घेतला होता ज्यामध्ये गावातील १० समूहामधील ९९% सदस्यांचे बँक खाते त्यांनी एकाच दिवसात उघडले होते.
सर्व पात्र सदस्यांचे जीवनज्योती व जीवनसुरक्षा विमा नोंदणी केली होती आणि पात्र सदस्यांची अटल पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करून घेतली होती. त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता त्यांनी एकूण २५७ स्वयंसहाय्यता समूहांची बँक खाती उघडली आहेत. स्वयंसहाय्यता समूहातील सदस्य तसेच समूहाबाहेरील अशाप्रकारे एकूण २ हजार ८०० व्यक्तींना वैयक्तिक बँक खाती उघडून दिलेली आहेत. कारी प्रभागातील पात्र समूहांना आजपर्यंत २ .५ कोटी रुपये अर्थसहाय्य म्हणून बँकेमार्फत मिळवून दिलेले आहेत.
प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेमध्ये एकूण १४५२ व्यक्तींची नोंद केलेली आहे तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत १४७९ लोकांचा समावेश केलेला आहे. अटल पेन्शन योजनेबाबत समूहातील सदस्यांना योग्य प्रकारे माहिती देवून आजपर्यंत त्यांनी एकूण २७० सदस्यांना अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केलेले आहे. त्यांची ही आकडेवारी सातारा तालुक्यातील बँक सखीमध्ये त्यांना आघाडीवर घेवून जात आहे.
रुबिना मुजावर या आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या कुटुंबियांच्या भक्कम साथीसोबतच, उमेद परिवारातील त्यांचे सोबती म्हणजेच आपल्या प्रेरिका, आर्थिक साक्षरता सखी तसेच समूहातील सदस्य यांना देतात. त्याचबरोबर सातारा तालुका अभियान कक्षातून वेळोवेळी मिळणारे प्रभावी मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन या सर्व गोष्टीना त्या आपल्या यशातील हिस्सेदार मानतात.