दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । फलटण । बँकिंग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज, ठेवी व सेवा अश्या विविध योजनांद्वारे ग्राहकांना समाधानी ठेवुन विनम्र व तत्पर सेवेसाठी कटिबद्ध आहे. नॅशनल बँकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचा व्याप व जबाबदाऱ्या जास्त असल्यामुळे ग्राहकांना आवश्यक सेवा तेवढ्या तत्परतेने मिळत नाहीत हे जरी सत्य असलं तरी ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारासाठी नॅशनल बँका सुरक्षित व फायदेशीर असतात. बँक ऑफ महाराष्ट्राच्या विविध कर्ज योजना यामध्ये गृहकर्ज, वाहनकर्ज, व्यवसायकर्ज, वैयक्तिककर्ज, सोनेतारणकर्ज हे अल्प व्याजदरात उपलब्ध आहे, त्याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा. कर्ज प्रक्रिया ही जलद गतीने करून देण्याचे हमी आम्ही देतो. बाहेरील राज्यातील कर्मचरांमुळे संवादामध्ये काही त्रुटी राहतात त्या ग्राहकांनी समजून घ्याव्यात.असे मत बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर विवेक नाचणे साहेब यांनी व्यक्त केले.
प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन च्या शेजारील नवीन इमारतीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र झोनल मॅनेजर विवेक नाचणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या विविध योजना संदर्भात माहिती देण्यासाठीचा व पूर्व कर्जमंजुरी यांचे धनादेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
झोनल मॅनेजर श्री विवेक नाचणे यांनी विविध प्रश्नांना उत्तर देताना बँकेच्या कामकाजामध्ये झालेल्या आमूलाग्र बदलांची माहिती दिली. ग्राहकांना कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर ती व्यवस्थितपणे सोडवली जाईल, या मेळाव्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र च्या विविध कर्ज योजनांची माहितीपत्रक तसेच त्या कर्जा संदर्भात येणाऱ्या अडचणीं व त्रुटी कशा दूर करता येतील याविषयी साध्या सोप्या भाषेमध्ये नाचणे साहेबांनी विवेचन केलं.
उपस्थित असणाऱ्या ग्राहक वर्गातून अनेक समस्यांविषयी प्रश्न विचारण्यात आले, यामध्ये प्रामुख्याने विनम्र सेवेबद्दल तसेच कागदपत्रांच्या त्रुटी असल्यास मारावे लागणार हेलपाटे तसेच कुठल्याही गोष्टी संदर्भात कम्युनिकेशन मधील असलेला अभाव या प्रामुख समस्यां मांडण्यात आल्या. या संदर्भात नाचणे म्हणाले की, तुम्हाला यापुढे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
बहुतेक बँक ऑफ महाराष्ट्राचा स्टाफ आंतरराज्य असल्यामुळे संवादामध्ये थोडासा फरक पडतो. तो ग्राहकांनी समजून घ्यावा. बँकेवरती विश्वास व सहकार्याची भूमिका ठेवत, तुमच्या काही समस्या असतील तर बँक ऑफ महाराष्ट्र फलटण शाखेचे मुख्य प्रबंधक जगन्नाथ प्रसाद पट्टनायक असतील किंवा वरिष्ठ प्रबंधक ध्यान चंद असतील यांना तुम्ही वेळोवेळी भेटून तुमच्या समस्या सांगत जा. ज्यामुळे बँकेच्या कामकाजामध्ये सुधारणा करता येईल, असेही नाचणे यांनी स्पष्ट केले.
तसेच ट्रॅक्टर प्रकरणे, गृहकर्ज शेतीविषयक कर्ज, वैयक्तिक कर्ज असलेल्या सर्वांच्या प्रश्नांविषयी यावेळी नाचणे यांनी खुलासेवार विवेचन दिले. आणि ग्वाही दिली की यापुढे तुम्हाला तत्पर आणि विनम्र सेवा देणे हे आम्ही आमचे परमकर्तव्य समजतो असेही नाचणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र फलटण शाखेचे चीफ मॅनेजर जगन्नाथ प्रसाद पट्टनायक यांनी फलटण शाखेमधील नवीन योजनांविषयी माहिती दिली. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र कोळकी शाखेचा स्टाफ ही यावेळी उपस्थित होता.
यावेळी पूर्व कर्ज मंजुरी धनादेश प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे व विशाल पाटील यांना नाचनेसाहेब यांच्या हस्ते देण्यात आले. पट्टनायक यांनी सर्वांचे आभार मानले.