
दैनिक स्थैर्य । 11 मे 2025। सातारा। मोती चौक ते 501 पाटी या दरम्यानचा वर्दळीचा रस्ता सातारा पालिकेने ’नो हॉकर्स झोन’ घोषित केला आहे. त्यानंतरही काही विक्रेत्यांची गेल्या तीन दिवसापासून या भागात घुसखोरी सुरू आहे. पालिकेने या मार्गावर तपासणी मोहीम सुरू ठेवली असून, विक्रेत्यांना बसण्यास प्रतिबंध केला जात आहे. या मोहिमेत शनिवारी पालिका कर्मचारी आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिका वेगवेगळ्या उपायोजना करत आहे. वर्दळीचे काही मार्गांवर वाहतुकीत अडथळे येऊ नयेत, म्हणून मोती चौक ते 501 पाटी रस्ता ’नो हॉकर्स झोन’ करण्यात आला आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आठ दिवसांपूर्वी हा निर्णय जारी जारी केला. महात्मा फुले भाजी मंडई परिसरात हॉकर्स झोन तयार करून, तेथे विक्रेत्यांनी बसावे, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, मोती चौक ते 501 पाटी हा मुख्य बाजारपेठेचा रस्ता असल्याने, या रस्त्यावर बसण्याचा मोह विक्रेतांना सोडवत नाही. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांचा माल जप्त करण्याची मोहीम पालिकेने तीन दिवसांपासून सुरू केली आहे.
ही मोहीम सातत्याने राबवली जात असल्याने, मोती चौकाकडून पोलीस मुख्यालयाकडे जाणारा रस्ता प्रशस्त वाटत आहे. विशेषतः सदाशिव पेठेतील धनकेशर दुकानाच्या बोळात आणि समोर रस्त्यावर केरसुणी, झाडू आणि अन्य छोटेमोठे विक्रेते दुकानांसमोर बसत होते. त्यांचा मुक्काम पालिकेने हलवला असला, तरीसुद्धा काही विक्रेते शनिवारी या रस्त्यावर बसले होते. त्यामुळे त्यांचा माल जप्त करण्याची कारवाई पालिकेने सुरू केली असता, कर्मचारी आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे पथक दुपारी 12 वाजल्यापासून या रस्त्यावर गस्त घालत होते. पालिकेने सज्जड कारवाईचा इशारा दिल्यानंतर विक्रेते तेथून निघून गेले. एकीकडे पालिका ही कारवाई करत असताना, दुसरीकडे दुकानदार दुकानासमोर जाळ्या टाकत आहेत. त्यांच्यावर कोणती कारवाई होणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.