बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली नवीन रुग्णवाहिका; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना यश; दुर्गम भागातील रुग्णांना दिलासा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२८: जावली तालुक्यातील अति दुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या बामणोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आधुनिक सोयी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका नसल्याने या भागातील रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. मात्र आता ही गैरसोय कायमची दूर झाली असून आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून बामणोली आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मिळाली आहे. कोरोना महामारीच्या गंभीर काळात नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जावली तालुक्यातील अति दुर्गम, डोंगराळ भाग असलेल्या बामणोली परिसरातील रुग्णांसाठी बामणोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात बामणोली परिसरातील विविध गावातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र या आरोग्य केंद्राकडे अद्यावत आणि आधुनिक सोयी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे आणि परिसरातील ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना नवीन रुग्णवाहिका मिळवून देण्याची मागणी केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे बामणोली आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यासंदर्भात लेखी पत्रव्यवहार करून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठपुरावा केला.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून शासनाने बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. शनिवार दि. २८ रोजी ही रुग्णवाहिका बामणोली आरोग्य केंद्रात दाखल होणार असून या रुग्णवाहिकेमुळे या भागातील रुग्णांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नांतून मेढा ग्रामीण रुग्णालयानंतर आता बामणोली आरोग्य केंद्रालाही रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने जावलीतील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

Back to top button
Don`t copy text!