वाई तालुक्यात खरीप हंगामाच्या मशागतीत बळीराजा व्यस्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पाचगणी दि. 2 : वाई तालुक्यात वळिवाच्या पावसाने दमदार सुरुवात केल्याने खरीप हंगाम चांगला जाणार अशी खात्री मनात बाळगून वाई तालुक्यातील शेतकर्‍यांनी शेतीच्या अंतर्गत कामाला जोमात सुरुवात केली आहे.

निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून राहून दरवर्षी शेतकरी नव्या जोमाने शेतात कामाला लागतो. यावर्षीही वळिवाचा पाऊस चांगला पडल्याने आभाळाएवढ्या अपेक्षा मनात धरून बळीराजा कामाला लागला आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बळीराजाच्या माथी कोरोनाचे व निसर्गाच्या लहरीपणाचे दुहेरी संकट असून दोन महिन्याच्या लॉकडाउनमध्ये तालुक्यातील शेतकरी शेतातील मालाला भाव न मिळाल्याने पुरता मोडून पडला आहे. बाजार समिती ही शेतकर्‍यांच्या हितासाठी सुरू केलेली हक्काची संस्था मानण्यात येत होती.

मात्र कोरोनाच्या काळात शेतकर्‍यांना बाजार समितील व्यापार्‍यांनीच लुटले आणि याला बाजार समितीच्या संचालकांचा पाठिंबा असल्याने  दरवर्षी वाई तालुक्यातील खरीप हंगाम वायाजात असून शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. व्यापारी मात्र इमले बांधून बसले आहेत. शेतकर्‍याने मात्र आपला माल भाव नसल्याने शेताच्या बांधावर टाकला. या उभ्या पिकात नांगर घातला. याला सर्वस्वी शेतकरी विरोधी धोरण जबाबदार आहे. तरीही जगाचा पोशिंदा बळीराजा मात्र नव्या जोमाने शेतात राबताना दिसत आहे. संपूर्ण वाई तालुक्यात पेरणीपूर्व अंतर्गत मशागतीची कामे सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. निसर्गाने मनासारखी साथ दिल्याने समाधानाचे वातावरण आहे,

वाईच्या पश्‍चिम भागात भाताची तरवे टाकण्याचे काम सुरू झाले असून पूर्व भागात मात्र मृग नक्षत्रावर पेरणी करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. वाईच्या पश्‍चिम या पूर्व भागात शेतकर्‍यांना बैलांची कमी भासत असून बैलजोडी महाग झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी मशागतीसाठी ट्रॅक्टरचा आधार घेताना दिसत आहेत. खरीप हंगामासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी बळीराजा शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे.काही बागायती क्षेत्र असणार्‍या गावांमध्ये भाजीपाल्यांचा निपटारा सुरू आहे. त्यातच दोन दिवसांपासून आभाळाचे वातावरण असून ढगाळ वातावरण असल्याने मान्सून पावसाला लवकरच सुरुवात होईल, असे चित्र सध्या वाई तालुक्यात दिसत आहे.

खरीप हंगामात बाजरी, मूग, सोयाबीन, भात, भुईमूग, बटाटा, हायब्रीड, तूर, वाटणा, घेवडा या पिकांच्या पेरणीसाठी वाई तालुक्यात शेतीची मशागत सुरू आहे. त्यातच बैलजोडी सध्या ठराविक ठिकाणीच मिळत असल्याने त्यांचे भाव वधारले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा कल हा यांत्रिकी शेतीकडे झुकलेला दिसत आहे. चांगल्या पद्धतीचे बियाणे वापरण्यासाठी कृषी विभाग झटताना दिसत आहे. वाई कृषी विभागाने तर शेतकर्‍यांना बांधावर जावून खते व बियाणे देण्याची तयारी दर्शविली असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरिश्‍चंद्र धुमाळ यांनी केले आहे. बियाणे मिळविण्यासाठी शेतकरी दुकानातून गर्दी करताना दिसत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!