दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीची एकरकमी पंधरा टक्के व्याजासह बिलं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नाही. तसेच शेतकऱ्यांना साखर कारखानदार योग्य उसदर देत नाही या मागण्यांवर वारंवार बैठका चर्चेच्या पलीकडे काहीच होत नाही. या अन्यायाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सातारा कोरेगाव मार्गावर बेमुदत रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
या इशाऱ्याचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना देण्यात आले. या निवेदनात नमूद आहे उसदर नियंत्रण कायदा 1966 प्रमाणे साखर कारखान्यांनी एकरकमी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात चौदा दिवसाच्या आत जमा करावयाची आहे. तसेच बळीराजाच्या हककाचा कायदेशीर उसाचा दर सुद्धा द्यावयाचा आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात गळीत हंगाम सुरु होऊन महिना उलटला तरी अघाप एफआरपी ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
महावितरणच्या वतीने शेतीपंपाची खोटी बिले दिले जात असून ती देणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. गेली दहा वर्ष शेतीपंपाची बिले देण्यात आली नाहीत . वीज बिल वसुलीच्या योजना लागू करून ते वीजबिल दमदाटी करून सर्रास वसूल केले जात आहे . शेतकर्यांना बिलाचा हिशोब समजेल या पद्धतीने वसुली करण्यात यावी .
या दोन प्रमुख मागण्यांची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन त्याची सोडवणूक करावी . अन्यथा शेतकऱ्यांच्या साथीने स्वाभिमानी शेतकरी संघटना १ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौकात बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.