
दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
सोमेश्वर कारखान्याप्रमाणे श्रीराम कारखान्याने उसाचा दुसरा हप्ता द्यावा व नवीन ऊस दर जाहीर करावा यासाठी श्रीराम जवाहर सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी सभासद बजरंग गावडे यांनी कारखाना गेटसमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम व फलटण नगरपालिकेचे नगरसेवक अशोकराव जाधव हेही आंदोलनाला बसले आहेत.
यावेळी कारखाना सभासद बजरंग गावडे यांनी श्रीराम जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याबरोबर उसाचा दुसरा हप्ता द्यावा व नवीन ऊस दर जाहीर करावा. तसेच शेतकर्यांना त्यांच्या हकाचे पैसे मिळाले पाहिजेत, ते त्यांच्या कष्टाच्या घामाचे दाम मागत आहेत. तरी आपण शेतकर्यांच्या उसाचा दुसरा हप्ता द्यावा व नवीन ऊस दर जाहीर करावा. फलटण तालुयातील शेतकरी सभासदांचा अपमान करू नये. या बाबीची आपण संपूर्ण जबाबदारी घेऊन शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा.