दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२१ । सातारा । एका शिक्षिकेकडे शारीरिक संबंधाची मागणी केल्या प्रकरणी अटकेत असलेला सातारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांना सोमवारी अटक करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांनी दिली.
संजय धुमाळ यांनी दि. 5 ऑक्टोंबर 2019 ते 17 जुन 2021 या कालावधीत सातारा तालुक्यातील एका शाळेवर शिक्षक म्हणून काम करत असलेल्या महिलेला वेळोवेळी फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. तुझ्याविरुद्धच्या सर्व तक्रारी मी निकाली काढीन. त्या तक्रारी मी मुद्दामच केल्या होत्या, असे सांगत धुमाळ याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. त्या महिलेने विरोध केला असता तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य धुमाळ याने केले होते.
याबाबत संबंधित महिलेने शनिवारी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर प्रकृतीच्या कारणावरून धुमाळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होते. मात्र, सोमवारी वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांची प्रकृती ठीक असल्याचा रिपोर्ट दिल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. धुमाळ यांना अटक केल्याची माहिती मिळताच शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. दुपारी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या जोर बैठका सुरू होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी अटकेबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.
दरम्यान, मंगळवारी धुमाळ यांना सातारा न्यायालयात न्यायालयासमोर हजर केले असता पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. मात्र, धुमाळ यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
आज निलंबनाची कारवाई शक्य
कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकरणात अटक झाली तर 48 तासानंतर शासन त्याच्यावर निलंबनाची कारवाई करते. याबाबत मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे संपर्क साधला असता नियमानुसार संजय धुमाळ याच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात येईल. मात्र, ही कारवाई बुधवारी केली जाईल, असे सांगण्यात आले.