दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा जिल्हा न्यायालयाने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना आज जामीन मंजूर केला. सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूर येथील खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांना चार दिवसांच्या मिळालेल्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली हाेती.
पोलीस कोठडी संपल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली हाेती. यानंतर सदावर्ते यांच्या वकिलांनी जामीन अर्ज केला. यावर पुन्हा युक्तिवाद झाला. मात्र, जामीन अर्जावर निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. मंगळवारीही याबाबत निर्णय झाला नाही. आज न्यायालयाने सदावर्ते यांना सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
छत्रपतींच्या वारसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सातारा शहर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता ६ वे प्रथम न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांनी सदावर्ते यांना सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. यावेळी कोर्टात दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी युक्तिवादाचे अवलोकन करून निर्णय दिला.