
फलटण नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारती आणि सभागृहांना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांसारख्या महापुरुषांची नावे देण्याच्या प्रस्तावाला ‘समस्त बहुजन समाज, फलटण’च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून, नगराध्यक्षांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 24 मार्च : फलटण नगरपरिषदेच्या विविध प्रशासकीय इमारती, सभागृहे आणि शॉपिंग सेंटर यांना देशातील थोर महापुरुषांची नावे देण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे. या अत्यंत स्वागतार्ह आणि गौरवास्पद प्रस्तावाला आता ‘समस्त बहुजन समाज, फलटण’च्या वतीने जाहीर आणि ठाम पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. या अनुषंगाने बहुजन समाजाच्या विविध मान्यवरांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांना एक सविस्तर निवेदन सुपूर्द केले.
यावेळी विविध नगरसेवक, पदाधिकारी आणि बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या उन्नतीसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या महापुरुषांचा सन्मान होणे ही अभिमानाची बाब असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
कोणकोणत्या नामांतरांना आहे पाठिंबा?
बहुजन समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात खालील प्रस्तावित नावांना पूर्ण पाठिंबा दर्शवण्यात आला आहे:
-
मुख्य प्रशासकीय इमारत: फलटण नगरपरिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीस ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे नाव देण्यात यावे.
-
नगरपरिषद सभागृहे: नगरपरिषदेच्या दोन्ही सभागृहांना अनुक्रमे ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले’ आणि ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांची नावे देण्यात यावीत.
-
शॉपिंग सेंटर: गडसोली मैदानासमोरील शॉपिंग सेंटरला ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्यात यावे.
-
संजीवराजे नगर: संजीवराजे नगर या भागाचे नामांतर करून त्याला ‘छत्रपती सईबाई महाराज’ यांचे नाव देण्यात यावे.
‘वैयक्तिक फायद्यासाठी विरोध करणे दुर्दैवी ठरेल’
या निवेदनात अत्यंत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडताना बहुजन समाजाने म्हटले आहे की, “वरील नामांतर प्रस्तावांना संपूर्ण बहुजन समाजाचा ठाम पाठिंबा आहे. समाजहित आणि इतिहासाचा सन्मान लक्षात घेता, या निर्णयाला कोणत्याही प्रकारचा राजकीय स्वार्थ किंवा वैयक्तिक फायद्यासाठी विरोध करणे ही अत्यंत दुर्दैवी बाब ठरेल. त्यातून विरोध करणाऱ्या संबंधित व्यक्तींची मानसिकता स्पष्ट होईल.”
उद्या (दि. २५ मार्च) होणाऱ्या नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सर्व माननीय नगरसेवकांनी उपस्थित राहून, एकमताने आणि सकारात्मक भूमिकेतून हे नामांतर प्रस्ताव मंजूर करून घ्यावेत, अशी नम्र विनंतीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महापुरुषांच्या नावाला कोणीही विरोध करणार नाही: नगराध्यक्ष
हे निवेदन स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सकारात्मक भूमिका मांडली. ते म्हणाले, “बहुजन समाजाचा आणि त्यांच्या भावनांचा आदर फलटण नगरपरिषद नक्की करेल. कोणत्याही व्यक्तिगत नावाच्या आग्रहापेक्षा महापुरुषांच्या नावाला सभागृहात कोणीही विरोध करणार नाही आणि सर्वमताने हा ठराव मंजूर होईल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे.”
या निवेदनामुळे उद्या होणाऱ्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत या नामांतराच्या ठरावाला मिळणारा पाठिंबा आणि सभागृहातील चर्चा पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

