
दैनिक स्थैर्य | दि. ०४ नोव्हेंबर २०२१ | सातारा | राज्य सरकारने थकीत वीजबिल माफ करुन विज कनेक्शन कापणे किंवा वीजपुरवठा खंडीत करणे तत्काळ थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बहुजन मुक्ती पार्टी आघाडीचे अध्यक्ष तुषार मोतलिंग यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राज्यात अनेक सरकार सत्तेवर येत असताना विज बिल माफीचा तसेच मोफत वीज देण्याचा नारा देऊन येत असतात. परंतु सत्तेमध्ये आल्यानंतर वीज बिलाच्या संदर्भामध्ये वीज बिलाच्या आकारणीच्या संदर्भामध्ये वीज मोफत देण्याचा संदर्भामध्ये एक ही सरकार आजपर्यंत महाराष्ट्रमध्ये बोलताना दिसत नाही. या उलट महाराष्ट्रामध्ये जे सरकार बनले आहेत त्या सरकारने सामान्य वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये वीज शुल्क आकारुन लूट केली आहे. त्याच्यामध्ये शेतकरी असतील, घरगुती वीज कनेक्शन असेल, व्यापारी असतील या सर्वांची लुट वेगवेगळी सरकार करत आहेत. सद्यस्थितीत दिपावली सुरु असताना विज कनेक्शन तोडणी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी अंधारात होणार का? हा प्रश्न पडत आहे. किमान सणासुदीच्या काळात तरी सरकारने विज कनेक्शन कट करुन जनतेचा अंत पाहू नये. थकीत वीजबिलामुळे सरकारतर्फे सुरु असलेली विज कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवावी,२00 युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करण्यात यावे, मीटर भाडे कपात करण्यात यावे, सक्तीची वीजबिल वसुली तत्काळ थांबवावी, या मागण्या मान्य झाल्या नाही तर बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन युवा पार्टी, युवा आघाडी व बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्यावतीने महाराष्ट्रात दि. १0 रोजी वीजबिल जलाओ आंदोलन तर २0 रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येईल. तर ७ डिसेंबर रोजी उर्जामंत्री यांच्या घराला घेराओ आंदोलन करण्यात येईल.