
स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑगस्ट : कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, बारामती येथील कृषीदुतांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्यक्रमांतर्गत परिसरातील शेतकऱ्यांना डाळिंब पिकासाठी ‘बॅगिंग तंत्रज्ञाना’चे महत्त्व पटवून दिले. येथील शेतकरी बबलू शेख यांच्या शेतात या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डाळिंब पिकाचा दर्जा सुधारणे, रोग-किडींपासून संरक्षण करणे आणि निर्यातीयोग्य उत्पादन घेणे हे आजच्या शेतकऱ्यांपुढील मोठे आव्हान आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून फळांना कागदी पिशव्यांनी झाकण्याच्या (बॅगिंग) तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. बॅगिंगमुळे होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
- तेल्या रोग आणि फळमाशी यांसारख्या किडींवर नियंत्रण मिळवता येते.
- फळांचा रंग, आकार आणि दर्जा सुधारतो.
- रासायनिक फवारण्यांवरील खर्च कमी होतो.
- फळे स्वच्छ व डागविरहित राहत असल्याने निर्यातीसाठी अधिक योग्य ठरतात.
यावेळी कृषीदूत सार्थक खरात, पृथ्वीराज जगताप, यशवर्धन कवटकर, निखिल कालेकर, वरद देशमुख, प्रथमेश कुंभार, ओंकार कोकाटे आणि आदित्य केकाण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.