
दैनिक स्थैर्य । दि. २२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण नगरपालिका हद्दीतील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत बिकट झाली असून शहरापेक्षा ग्रामीण भागातील रस्ते चांगले असल्याचे मत नागरिकांच्या मधून व्यक्त होत आहे. तर सध्या फलटण नगरपालिकेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी कामकाज पाहत आहेत; मुख्याधिकारी हे शहरातील मूलभूत सुविधा सोडवण्याच्या ऐवजी ठेकेदारांमध्येच गुंग असल्याची चर्चा फलटण शहरातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
फलटण शहरांमधील प्रमुख रस्त्यांची निविदा शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काढण्यात आली. परंतु वास्तविक पाहता तसे न होता; फलटण शहरातील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. सोशल मीडियामध्ये तर फलटणच्या रस्त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून या सोबतच शहरातील रस्त्यांचे विविध मीम्स दररोज व्हायरल होत आहे.
शहरांमधील रस्त्यांच्या डागडुजीची कामे ही वारंवार करण्यात येतात. ही करण्यात येणारी कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून फक्त सोयीस्कररित्या ही कामे केली जात असल्याचेही शहरात बोलले जात आहे. कामे झाल्यानंतर काही दिवसांमध्येच रस्त्यांची परिस्थिती आहे अशीच होत असल्याने नागरिकांमधून नगरपालिकेच्या बाबतीत तीव्र भावना व्यक्त होत असतात.
फलटण शहराची कायमच तुलनाही शेजारी असलेल्या बारामती शहराबरोबर होत असते. बारामतीमध्ये माजी केंद्रीय मंत्री पदासह देशातील विरोधकांना एकत्रित करून लढा देत असलेल्या खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार हे कार्यरत आहेत. बारामतीच्या विकासाबाबतीत अजित पवार कधीही मागे पुढे बघत नाहीत. बारामतीसाठी विशेष निधी मंजूर करून आणून तो निधी योग्यरीत्या वापरला जात आहे, की नाही व जी कामे केली जात आहेत; ती त्या दर्जाची केली जात आहेत की नाहीत, याची पाहणी स्वतः अजित पवार वेळोवेळी करीत असतात.
बारामती सारखे नाही, परंतु इतर शहरांप्रमाणे फलटण शहरातील मूलभूत प्रश्न त्यामध्ये रस्ते, स्वच्छ पाणी व कचऱ्याचे निर्मूलन ही कामे तरी प्रशासनाने प्राधान्याने करणे गरजेचे आहे. वास्तविक असे न होता प्रशासन हे इतर कामकाजामध्येच गुंग असल्याचे दिसून येत आहे.
फलटण शहरातील रस्त्यांबाबत फलटणकर नागरिक तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. याबाबत आम्ही फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, फलटण शहरातील रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने जुना डीएड कॉलेज चौक ते पृथ्वी चौक या पर्यंतचा रस्ता येत्या काही दिवसांमध्ये चांगल्या दर्जाचा होणार आहे. पृथ्वी चौक ते नाना पाटील चौक हा रस्ता नगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचा करण्याचे काम सुरू आहे. शहरातील इतर असणारे रस्ते हे चांगले व दर्जेदार आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत शहरातील सर्वच रस्ते हे चांगल्या दर्जाचे होतील.