दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील बरड गावामधील धनगरवाडाच्या दरम्यान असलेल्या रस्त्याची मुरूम वाहतुकीमुळे दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे रस्त्यावर असणाऱ्या पाणीपुरवठा पाईपलाईन सुद्धा फुटलेल्या आहेत. तरी सदरील रस्त्याची डागडुजी करून फुटलेली पाईपलाईन बदलण्याची मागणी बरड ग्रामपंचायतीचे सदस्य शेखर काशीद यांनी केलेली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ग्रामपंचायत सदस्य शेखर काशीद म्हणाले कि, रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत व फुटलेल्या पाईपलाईन बाबत वारंवार प्रशासनाला माहिती देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. बाहेरच्या गावाचे विकासकामे आणि त्यासाठी आपल्या गावाचे नुकसान अशी अवस्था बरड गावाची झालेली आहे. गावाचे झालेल्या नुकसानाला नक्की जबाबदार कोण ? असा सवाल सुद्धा काशीद यांनी उपस्थित केला आहे.
या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर मुरूमाची वाहतूक केल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, असेही काशीद यांनी स्पष्ट केले.