
दैनिक स्थैर्य । 6 मार्च 2025। आसू । गोखळी-राजाळे रस्त्यावर तीन ठिकाणी पडलेले मोठ मोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. संबंधित विभागाने या खड्ड्यांची त्वरीत दुरूस्ती करावी अशी मागणी फलटण पूर्वभागातील प्रवाशी व वाहनचालकांनी केली आहे. दुरुस्ती न झाल्यास पूर्व भागातील नागरिक रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आसू-देशमुखवाडी ते गिरवी-वारूगड पायथा या 47 किमी रस्त्याचे काम राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीकडून यांच्याकडे आहे. आसू देशमुखवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील पश्चिमेकडील शेवटचे गाव आहे. याठिकाणाहून सातारा जिल्ह्यात आसू-पवारवाडी, गिरवी- वारुगड पायथा (जाधववाडा) येथपर्यंत हा रस्ता होणार आहे.
सध्या गिरवी वारूगड बाजूकडून काम सुरू असून याकामाला फलटणपर्यंत पूर्ण होण्यासाठी चार महिने लागतील, असे कंपनीचे मालक राम निंबाळकर यांनी सांगितले. परंतु, फलटणपासून आसूपर्यंत जाण्यासाठी पाच ते सहा महिने म्हणजेच हा रस्ता डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे.
सध्या गोखळी राजाळे दरम्यानच्या रस्त्यावरील मठाचीवाडी फाटा, खटकेवस्ती आणि गोखळी पाटी वळण याठिकाणी मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ता खचला आहे. रात्री प्रवास करताना खड्डे लक्षात येत नसल्याने अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अगोदर येथे किरकोळ अपघात झाले आहेत. त्याशिवाय रस्त्यांवरून प्रवास करणार्या प्रवाशांना मणक्याचे दुखण्याचा त्रास वाढत आहे.
राजाळे येथील साधारण शंभर मीटर रस्ता गेली दोन तीन महिने झाले संबंधित ठेकेदाराने महावितरणच्या नावाखाली चर काढण्यासाठी खोदून ठेवला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
आसू-देशमुखवाडी ते गिरवी वारुगड पायथा रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती आठ दिवसात करावी. अन्यथा गोखळीपाटी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी दिला आहे.