स्थैर्य, सातारा, दि. १३ : हो मी त्याला बच्चनच म्हणणार!! शोले बॉय आहे मी… 1975 ला जन्मलेल्या प्रत्येक पोराचा सुपरहिरो!! फक्त बच्चन!! पुढील 2 दशकं ज्या पोरांनं फक्त बच्चन पाहिला.. अनुभवला… तो किती जवळचा वाटेल हो त्याला..बच्चन 1975 पासून सोबत आहे माझ्या.. आयुष्यात पहिला बघितलेला पिक्चर ‘ मुकदर का सिकंदर’ … त्यातील त्याची ती बाईकवरची एन्ट्री.. ‘ रोते हुये आते है सब.. ‘ क्या बात है!! ‘जिंदगी तो बेवफा है..’ म्हणत या जिंदागिने त्याला कितीतरी वेळा धोखा दिला.. त्याच्याकडून शिकलोय संघर्ष, प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहणं.. आर्थिक, शारीरिक, मानसिक सर्व स्तरावर लढा देत एकनिष्ठेने काम करीत राहणं!! कित्येक प्रकारचे भयंकर आजार, अपघात, राजकारण, भ्रष्टाचाराचे आरोप, आर्थिक दिवाळखोरी, कर्जबाजारी.. सर्वांना पुरून उरला बेटा!! ज्या वयात लोक पेन्शन घेऊन आरामखुर्चीत पडून नातवंडांच्या बाललीला बघत बसतात त्या वयात रात्रंदिवस हा गडी काम करतोय. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे फक्त पैसा मिळवायला करतोय म्हणावे तर त्याच्या कामात कुठंही पाट्या टाकणं दिसत नाही हो!! 100% देतोय तो… नुकताच आलेला ‘गुलाबो सिताबो’ बघा मग कळेल.. एक मात्र आहे… त्याला चांगले दिग्दर्शक लाभले की तो संधीचे सोने करतो. आणि ते उत्तरार्धात मिळत गेले. तिसरी इनिंग जोरदारच आहे त्याची!!!ए बच्चन, तू 100 वर्षे जिवंत राहणारच रे…पण त्यानंतर पुढची 100 वर्षे जिवंत राहणार आहेत ते तुझे किस्से , तुझे फॅन फॉलोअर्स, तुझी आणि रेखाची कथित प्रेमकहानी, तुझे वागणे.. नातवाच्या वयाच्या अभिनेत्याला सुद्धा इज्जत देणे, कौन बनेगा करोडपतीच्या सेटवरील तुझा वावर, तुझी संवादफेक, ‘हम जहाँ खडे होते है,लाईन वही से शुरु होती है’ ,’आज खुश तो बहुत होंगे तुम’, ‘रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते है’, ‘ 11 मूलको की पुलीस डॉन का इंतजार कर रही है!’ ‘तुम मुझे ढुंढ रहे हो, और मैं तुम्हारा यहा इंतजार कर रहा हूँ’ सारखे कडक अजरामर डायलॉग्ज, ‘ मैं और मेरी तन्हाई’ म्हणणारा तुझा धीरगंभीर, खर्जातला जोरकस आवाज, तुझे चालणे, तुझे बोलणे, तुझी नजर, तुझी स्माईल ‘मुछे हो तो नथुलाल जैसी..’ म्हणतानाची तुझी मिश्किली, sense of humour…कसं विसरू शकतो रे आम्ही?
©अभिजित वाईकर, सातारा.