
दैनिक स्थैर्य । 3 जुलै 2025 । सातारा । कर्हाड येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ’आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025’ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योगपती, सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स, नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष, भारत फोर्ज लिमिटेड, पुणेचे अध्यक्ष पद्मभूषण बाबा एन. कल्याणी यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोक गुजरयांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रतिष्ठानचे सदस्य अॅड.मानसिंगराव पाटील, दिलीपराव चव्हाण, राजेंद्र माने, विजय साळुंखे, रेश्मा कोरे, संयोजक समिती सदस्य अल्ताफ हुसेन मुल्ला, शोभाताई पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. गुजर म्हणाले, (कै.) पी. डी. पाटील यांच्या गौरवार्थ आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान गेली तीस वर्षांहून अधिक काळ येथे सांस्कृतिक वसामाजिक कार्य करत आहे. आदरणीय पी. डी. पाटील हे कन्हाडनगरीचे 42 वर्षे नगराध्यक्ष होते, हा एक विश्वविक्रम आहे. त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ 2011 पासून आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या थोर व्यक्तींनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा जागतिक पातळीवर नेली, अशा व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
2011 मध्ये प्रथम पुरस्कार जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना देण्यात आला. त्यानंतरआजअखेर नसिमा हुरजूक, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. ज्येष्ठराज जोशी, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. शा. बं. मुजुमदार, डॉ. अभय बंग, डॉ. जब्बार पटेल, डॉ. रणजित जगताप, डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. चंद्रकांत लोखंडे व अरुण जोशी यांना या पुरस्काराने गौरविले आहे.
प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठक झाली. त्यात 2025 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार बाबा कल्याणी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. बाबा कल्याणी हे भारत फोर्ज कंपनीनेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांना पद्मभूषण पुरस्कारही मिळाला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध समितीत ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कल्याणी यांना केलेल्या उत्तुंग कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. पुरस्काराचे वितरण (कै.) पी. डी. पाटील यांच्या स्मृतिदिनी 17 सप्टेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.