स्थैर्य,कऱ्हाड,दि ५ : महाराष्ट्राच्या राजकारणात वैरत्वासाठी गाजलेले माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे दोन्ही नेते व त्यांचे गट पहिल्यांदाच राजकीय वैरत्व संपवून एखादा दुसरा अपवाद वगळता तब्बल तीन दशकांनंतर एकत्र येत आहेत. कॉंग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सातारा जिल्ह्याचे संपर्कमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत दोन्ही दिग्गज नेते शुक्रवारी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येत आहेत. सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य येऊन कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश येणार आहे.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर या नेत्यांची कुटुंबे कॉंग्रेसला वाहिलेली कुटुंबे आहेत. दोन्ही कुटुंबांनी गेल्या कित्येक दशकांपासून कॉंग्रेसचा विचार आजअखेरही कायम ठेवला आहे. मात्र, दोन्ही नेते गेल्या चार दशकांपांसून अंतर्गत मतभेदांमुळे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. या दोन्ही गटांचा संघर्ष महाराष्ट्र राज्याने पाहिला आहे. अनेक घटनांतून या दोन्ही गटांचा संघर्ष टोकाला गेला होता. त्याचा सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसला मोठा फटका बसला. त्याचा परिणाम दोन्ही नेत्यांनाही सोसावा लागला. त्या दोन्ही नेत्यांनी यापूर्वीच्या निवडणुकी एकमेकांविरोधात लढवल्या. त्यादरम्यान कार्यकर्त्यांत मोठ्या मारामाऱ्याही झाल्या. त्यातून दोन्ही गट एकमेकांना पाण्यात पाहत होते. त्यादरम्यान संघर्षही वाढला होता. त्या संघर्षातच अनेक निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये दोन्ही गटांची शक्ती पणाला लागत होती. विचारधारा कॉंग्रेसचीच असली तरीही दोन्ही गट एकमेकांविरोधात गेली चार दशके होते. त्यातून दोन्ही गटांवर अनेक कटू प्रसंगही आले. मात्र, ते मागे हटले नाहीत. येणाऱ्या संकटांचा सामना करत दोन्ही गटांनी मार्गक्रमण केले. या ताणलेला संघर्षावर पडदा पडावा, असे महाराष्ट्रातीलच नाही तर देशपातळीवरही काम करणाऱ्या नेत्यांना वाटत होते. दोन्ही दिग्गज नेत्यांनी गट एकत्र आणण्यासाठी यापूर्वी प्रयत्नही केले. मात्र, काही कारणाने त्यात मिठाचा खडा पडत होता. त्यामुळे दोन्ही गटांचे विळ्याभोपळ्यांचे सख्य आणि चव्हाण-उंडाळकर गटातील धगधगती आग चार दशके कायम राहिली. त्यानंतर गेल्या दशकात उंडाळकर काका आणि ऍड. उदयसिंह पाटील यांना अन्य पक्षांनी मोठ्या ऑफर दिल्या. मात्र, त्याला भीक न घालता उंडाळकर पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षासाठी कार्यरत राहिले.
भविष्यातील राजकारण, आपली दिशा याचा चव्हाण-उंडाळकर गटाने दूरदृष्टीने विचार केला. कॉंग्रेसची विचारधारा सातारा जिल्ह्यात कायम ठेऊन ती वाढवण्यासाठी वैरत्व संपवून एकत्र येणे ही काळाची गरज होती. त्याचा श्रीगणेशा मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केला. त्यांचे एकत्र येणे दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाची नांदी ठरले. तेथून या दोन्ही गटांचे वैरत्व कमी होऊन एकत्रित येण्याचा प्रवास सुरू झाला. ऍड. उदयसिंह पाटील यांनी घेतलेली भूमिका यात महत्त्वाची ठरली. मलकापूर पालिकेत दोन्ही गटांच्या एकत्रिकरणामुळे मिळालेले यश हे आगामी निवडणुकांचीही नांदी ठरले. त्यातून सातारा जिल्ह्यात एक चांगला संदेश गेला. दोन्ही गट एकत्र आल्यावर काय होऊ शकते, याचाही प्रत्यय राज्यकर्त्यांना आला. त्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी गावपातळीवर एकमेकांना सहकार्य करून एकत्रित पॅनेल टाकले. त्यातही त्यांना यश आले. त्यामुळे हा पॅटर्न गावागावांत रुजू लागला.
मलकापूर पालिकेच्या निवडणुकीपासून सुरू झालेला उंडाळकर आणि चव्हाण गटाच्या शिखरावर आज (ता. सहा) कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत कळस चढवण्यात येणार आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण व माजी सहकारमंत्री उंडाळकर, सातारा जिल्ह्याचे संपर्कमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, ऍड. उदयसिंह पाटील यांच्यासह त्यांच्या गटाचे शिलेदार उपस्थित राहणार आहेत.
कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य अन् कार्यकर्त्यांत नवा जोश
सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसची मरगळ जाऊन कॉंग्रेसचे नवे पर्व यानिमित्ताने सुरू होणार आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणामुळे जिल्ह्यातील कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य येऊन कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश येणार आहे.