स्थैर्य, औरंगाबाद, दि. 29 : उच्च न्यायालयात बहुजन समाजाचे जजेस हा एक कल्पनाविलास होता. यशवंतराव चव्हाण यांनी हस्तक्षेप केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात सावंत, देशमुख, कोळसे अशी वहिवाट पडली आणि ती सार्थ ठरविणाऱ्यापैकी सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बॅ. बलभिमराव नरसिंगराव देशमुख ( बी.एन.) देशमुख (85वर्षे) यांचे गुरुवारी मध्यरात्री रात्री 1.30 चे सुमारास औरंगाबाद येथे निधन झाले आहे. त्यांचे पार्थिवावर आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता औरंगाबाद येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांचे मागे मुलगा सुन दोन नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी राज्यसभा सदस्य अँड.नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, माजी खासदार उध्दवराव पाटील यांचे ते भाच्चे होत.
ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. उच्च व सर्वोच्च न्यायालयात ते वकिली करत असताना राज्य विधान परिषदेवर त्यांची निवड झाली होती. नंतर त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. शेतकरी, कष्टकरी कामगार तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय ‘ऐतिहासिक’ ठरले होते.