
दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । सातारा । रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या
वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘आजादी का अमृतमहोत्सव’ जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. सातारा येथील राजवाडा चौकातून शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच राष्ट्रीय छात्र सैनिकानी प्रभात फेरीला प्रारंभ केला. स्वातंत्र्यासाठी ज्या राष्ट्र निर्मात्यांनी व शहीद वीरांनी आपले आयुष्य समर्पित केले त्यांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून देण्यासाठी व भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या जाज्वल्य इतिहासाची नवीन पिढीला ओळख करून देण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव प्रभात फेरी आयोजित करण्यात आली. छात्रसैनिकांनी ‘भारत माता की जय’,’ भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो’ या जयघोषाने सातारा शहरातील प्रमुख रस्त्यावरील वातावरण दुमदुमून गेले. महाविद्यालयाचे एन.सी.सी ऑफिसर प्रा. लेफ्टनट केशव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिनियर अंडर ऑफिसर किशोर पंडित, ज्युनिअर अंडर ऑफिसर अनिकेत ननवरे सिनियर अंडर ऑफिसर प्रियांका चव्हाण सार्जंट प्रज्ञा पाटील, जान्हवी सत्रे यांनी कार्यकर्माचे उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर
यांनी महाविद्यालयाच्या एन.सी.सी.टीमचे अभिनंदन करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध उपक्रम घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या.