दैनिक स्थैर्य | दि. ११ मे २०२३ | फलटण |
सन २००५ मध्ये विनाअनुदान, अंशतः अनुदानावर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय आपण आझाद मैदानावरून उठणार नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचे समन्वयक व माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाच्या सहाव्या दिवशी पुणे विभागाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत बोलत होते. यावेळी पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार डॉ. सुरेश तांबे, श्रीकांत देशपांडे, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक राज्य महासंघाचे प्रा. डॉ. संजय शिंदे, व प्रा. आंधळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सन २००५ मध्ये विनाअनुदान, अंशतः अनुदानावर नियुक्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी दि. ३ मे २०२३ पासून आंदोलन सुरू असून या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचार्यांना सेवानिवृत्तीनंतर कोणत्याच प्रकारची पेन्शन मान्य झाली नाही. हे कर्मचारी सध्या सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर आले असून यातील काही शिक्षक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाची पेन्शन असल्याने संपूर्ण कुटुंबाला रोजगारावर जाण्याची वेळ येत आहे. वीस, पंचवीस, तीस वर्षे राज्य कर्मचारी म्हणून सेवा करूनही यांना कोणतीच पेन्शन भेटत नसेल तर तो त्यांच्यावर अन्याय आहे. या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना शासनाने जुनीच पेन्शन योजना लागू करावी.
सदर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना सेवेत येवून अनुदानावर येण्यासाठी खूप वर्षे वाट पहावी लागली असून जवळजवळ दहा वर्षे विनापगारावर काम करावे लागले आहे आणि आता यांनाच पेन्शन मिळणार नसेल तर हा त्यांच्यावर मोठा अन्याय आहे म्हणून या शिक्षकांना पेन्शन मिळालीच पाहिजे. जुनी पेन्शन ही त्यांच्या हक्काची असल्याचे सांगून या पेन्शनसाठी आपण आझाद मैदानावर सुरू केलेले आंदोलन शासनाकडून पेन्शन मान्य केल्याशिवाय हे आंदोलन संपवणार नसल्याचे आमदार दत्तात्रय सावंत यांनी सांगितले.
यावेळी पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, माजी आमदार सुरेश तांबे, प्रा. डॉ. संजय शिंदे, प्रा. आंधळकर व प्रा. रवींद्र कोकरे यांच्यासह अनेक शिक्षकांनी समन्वय समितीचे माजी आमदार दत्तात्रय सावंत व डॉ. सुरेश तांबे यांना पाठिंब्याचे पत्र देवून आपले विचार मांडले.
यावेळी हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.