कोरोना लढा यशस्वीतेसाठी आयुष उपचार पद्धतींचा वापर करावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.०८: कोरोना महामारीशी लढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित असलेल्या आयुष उपचार (आयुर्वेदिक, होमीओपॅथी, युनानी) पद्धतींचाही वापर करावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले.

वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित महाविद्यालयातील सोयी-सुविधा रुग्णांकरीता उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य संचालक डॉ.तात्याराव लहाने, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ.के.आर.कोहली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, कुलसचिव डॉ.कालिदास चव्हाण यांच्यासह राज्यभरातील पाचशेहून अधिक डॉक्टर्स या बैठकीत दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

कोविडच्या दुसऱ्या लाटेवरही मात करु

कोविडच्या पहिल्या लाटेत वैद्यकीय शिक्षण यंत्रणेने महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांचे अभिनंदन करुन वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री.देशमुख म्हणाले, कोरोनाची पहिली लाट ओसरली असे चित्र निर्माण झाले होते. मात्र आता दुसरी लाट आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी सामना करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण, आयुर्वेदिक, होमीओपॅथी, नर्सिंग, डेंटल, फिजिओथेरपी या महाविद्यालयांनी चांगले कार्य केले असून हे सर्व कोरोना योद्धे आहात. दुसरी लाट थोपविण्यासाठी यापुढेही संपूर्ण ताकदीनिशी कोरोनावर मात करावयाची आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. शासन या यंत्रणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही अशी शंका पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित होत आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावर होणार असून ही परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असल्यामुळे त्यावर केंद्रीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली होतात, असे स्पष्ट करुन परीक्षा पुढे ढकलणे किंवा रद्द होण्याबाबत शंका किंवा संभ्रम निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

आरोग्य संस्थांना लॉकडाऊन लागू नाही

वैद्यकीय शिक्षण प्रणालीत येणाऱ्या संस्था लॉकडाऊनमधून वगळण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासनाकडून महाविद्यालय बंद न करण्याच्या सूचना, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि शासनाकडून जिल्हा यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत. होमीओपॅथी, नर्सिंग अशा विद्यापीठाशी संलग्न असणारे अभ्यासक्रम, विद्यालय लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेले आहेत. याबाबत काही शंका असल्यास संचालनालय अथवा विभागाशी संपर्क साधावा, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

महाविद्यालयांनी कोविड नियमांचे पालन करावे

वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित महाविद्यालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून याबाबत संस्थांनी गांभीर्यपूर्वक दक्षता घेतली पाहिजे. त्याचबरोबर संस्थेत कोणालाही कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांचे लसीकरण तातडीने करुन घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

मृत्यूदर कमी तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असावे

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मृत्युदर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दर्जेदार आणि चांगले उपचार देऊन रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. सर्व सोयी-सुविधा पुरविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. सामान्यांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाने करावे, असे श्री.देशमुख यांनी सांगितले.

लसीचा जास्तीत जास्त पुरवठा करण्याबाबत केंद्राकडे प्रयत्न

रुग्णसंख्या वाढत असली तरी लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे लसीची कमतरता भासणार नाही यासाठी दक्षता घेतली जात असून लसींचा जास्तीत जास्त पुरवठा व्हावा याकरीता केंद्र सरकारकडे सातत्याने प्रयत्न केले जात आहे. लस ही एक प्रकारे कोरोनाशी लढा देणारे औषध आहे. लसीकरण केल्यानंतरही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे मृत्युदर कमी होण्यास मदत होईल अशी आशा आहे. यापूर्वी अनेक आजारांचा सामना आपण केला असून आता कोरानाशी लढा द्यायचा आहे त्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढविणारे डोसेस घ्यावे लागण्याची शक्यता आहे.

कोरोनाबाबत जनजागृती गरजेची

कोरोनाबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येते. यासाठी जनजागृती आणि योग्य माहिती सामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी, अध्यापक प्राचार्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना संघटीत करुन यासंदर्भात जनजागृती करण्याचा उपक्रम राबवावा, अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी यावेळी केल्या.


Back to top button
Don`t copy text!