स्थैर्य, आयोध्या, दि.१२: प्रदीर्घ काळानंतर अयोध्येत अखेर राम जन्मभूमीवर मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास अवजड ड्रिलिंग मशीनद्वारे मंदिराच्या पहिल्या पिलरसाठी ड्रिलिंग सुरू झाले. याआधी पायाच्या पिलरची एका महिन्याच्या आत चाचणी होणार आहे. ५ एकरांत मंदिराच्या पायासाठी जमिनीच्या आत एक मीटर व्यासाचे १०० ते १५० फुटांचे १२०० काँक्रीटचे पिलर्स बांधले जातील. हे सर्व पिलर्स एक हजार वर्षे मजबूत राहतील, अशा पद्धतीने याची बांधणी होणार आहे. त्यावर मंदिराचा १९ फूट उंच काँक्रीटचा प्लॅटफॉर्म बांधण्यात येईल. याच प्लॅटफाॅर्मवर १६१ फूट उंच व पाच शिखरे असलेले भव्य श्रीराम मंदिर उभे राहील. ड्रिलिंग करण्यापूर्वी पथकाच्या अभियंत्यांनी आणि कामगारांनी जन्मभूमीवर भगवान विश्वकर्मां यांची पूजा केली. हे बांधकाम करताना यंत्रात बिघाड अथवा अडथळा येऊ नये यासाठी ही पूजा होती. दरम्यान, या वेळी विश्वस्त, पुजारी आणि राम मंदिराचे वास्तुकार आशिष सोमपुरा यांची उपस्थिती होती. मंदिराचे बांधकाम सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन करण्यात आले होते.
काँक्रीटचे मानक व प्रमाण चेन्नई आयआयटीच्या टीमने ठरवले
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले, यंत्राने जमिनीत एक मीटर व्यासाचे १०० फूट खोल विहिरीत काँक्रीटचे मिश्रण टाकण्यात येईल. पहिल्या पिलरचे बांधकाम परीक्षणासाठी करण्यात येईल. एका महिन्यानंतर पिलरच्या काँक्रीटच्या क्षमतेची चाचणी होणार आहे. गरज भासल्यास काँक्रीटची मजबुती व आयुर्मान वाढवण्यासाठी आयआयटी चेन्नईच्या तज्ञांचा पुन्हा सल्ला घेण्यात येणार आहे. पिलरच्या वापरात होणाऱ्या साहित्याचे मानक व प्रमाण आयआयटी चेन्नईच्या संशोधन पथकाने निर्धारित केले आहे. यात स्टीलचा वापर होणार नाही.
1200 विहिरींच्या खोदकामासाठी तीन-चार रिंग मशीन
न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले, मंदिराच्या बांधकामासाठी १२०० विहिरी खोदण्यात येणार आहेत. यासाठी तीन ते चार रिंग मशीन लागतील. पहिल्या मशीनद्वारे काम सुरू झाले आहे. राम जन्मभूमी परिसरात सुमारे ५५ फुटांवर पाणी आहे. यासाठी नदीवर पुलाचे बांधकाम करताना ज्याप्रमाणे पिलर्सची उभारणी केली जाते, त्याप्रमाणेच येथे पिलर्स उभारण्यात येतील. पिलर जितका पाण्यात राहील तेवढी त्याची मजबुती अधिक असेल, असे मत अभियंत्यांनी व्यक्त केले.