फलटणमध्ये प्रथमच होणार अंधांसाठी स्वयंसिद्धता आणि सहसंवेदना सजगता कार्यशाळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण तालुका पंचायत समितीने फलटण तालुक्यातील अंधांसाठी व डोळस कार्यकर्त्यांसाठी दोनदिवसीय स्वयंसिद्धता आणि सहसंवेदना सजगता कार्यशाळेचे (Mobility & Empathy Awareness Workshop) आयोजन केले आहे, अशी माहिती पंचायत समितीतर्फे गटविकास अधिकारी श्री. कुंभार यांनी दिली.

कुंभार पुढे म्हणाले, अंध व्यक्तींना दैनंदिन जीवनात येणार्‍या अडचणींवर मात करून त्यांना आपले आयुष्य सुलभ आणि सुकरतेने जगता यावं यासाठी अंधांसाठी गेली २८ वर्षे काम करणारे स्वागत थोरात यांनी एक खास प्रशिक्षण पद्धती विकसित केली आहे. आतापर्यंत राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेल्या ६४ आणि मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथील एक अशा ६५ स्वयंसिद्धता कार्यशाळा त्यात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. ही कार्यशाळा व्हावी अशी तीव्र इच्छा फलटण तालुक्यातील अनेक अंध व्यक्तींची होती. त्यामुळेच ही कार्यशाळा फलटण येथे होत आहे.

दिनांक २६ व २७ डिसेंबर २०२४ रोजी सिध्दीविनायक मंगल कार्यालय, वनदेवशेरी, शिंगणापूर रोड, कोळकी, फलटण, जि. सातारा येथे संपन्न होणार्‍या या पहिल्याच कार्यशाळेत पांढर्‍या काठीची माहिती व उपयोग, पांढरी काठी शास्त्रशुद्ध पद्धतीने वापरण्याचे प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष वापर करण्याचा सराव, इतर ज्ञानेंद्रियांचा वापर सक्षमतेने कसा करायचा याबद्दलची माहिती व प्रशिक्षण, स्पर्शज्ञानाने विविध पदार्थ कसे ओळखायचे हे सर्व प्रशिक्षण स्वतः स्वागत थोरात देणार आहेत. स्वरूपा देशपांडे या कार्यशाळेच्या समन्वयक व सहाय्यक प्रशिक्षक आहेत. प्रशिक्षणार्थ्यांना येणार्‍या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकारणही करण्यात येणार असून कार्यशाळेची वेळ दोन्ही दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी असेल.

कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी पंचायत समिती, फलटणचे सर्व अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, ग्रामसेवक आणि सातारा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण खात्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांचे क्रियाशील सहकार्य लाभले आहे.

अंधांच्या वैयक्तिक जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणणार्‍या या स्वयंसिद्धता कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी अंधांनी चुकवू नये, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

या कार्यशाळेस सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. याशिनी नागराजन या उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ९५१८३०५८९१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच फलटण परिसरातील ज्या डोळस कार्यकर्त्यांना या कार्यशाळेसाठी मदतनीस म्हणून येण्याची इच्छा असेल, त्यांनीही नावनोंदणी करणे आवश्यक आहे.


Back to top button
Don`t copy text!