दैनिक स्थैर्य | दि. २ मे २०२३ | फलटण |
ढवळेवाडी, तालुका फलटण गावचे हद्दीत शेत जमीन गट नंबर ३६/२/१/ मध्ये पाण्याच्या पाजण्याच्या कारणावरून चुलत्याने दोघा पुतण्यांना कुर्हाडीच्या दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चुलत्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची फिर्याद लक्ष्मीकांत हरिभाऊ सुतार (वय ४२, राहणार ढवळेवाडी निंबोरी, तालुका फलटण) यांनी दिली आहे.
या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ मे २०२३ रोजी सकाळी ०९.३० वाजण्याच्या सुमारास शेतजमीन गट नं. ३६/२/१ मध्ये ढवळेवाडी निंभोरे, ता. फलटण गावच्या हद्दीत शेतात भुईमूगाला पाणी पाजण्याकरीता गेलो असता सामाईक पाईपलाईन फुटल्याने फिर्यादीचे चुलते विनायक रामचंद्र सुतार, रा. ढवळेवाडी निंभोरे याने त्याच्या हातातील लाकडी कुर्हाडीच्या दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यावर डाव्या बाजूला मारून पाडले व हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिविगाळ दमदाटी करीत असताना फिर्यादीचा लहान भाऊ गणेश हरीभाऊ सुतार हा भांडणे सोडविण्याकरीता गेला असता त्यास देखील हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार दाखल झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी चुलता विनायक रामचंद्र सुतार, राहणार ढवळेवाडी याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा. पोलीस फौजदार यादव करत आहेत.