
दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑक्टोबर २०२२ । सातारा । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आयोजित यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी आणि शारदाबाई पवार माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, जकातवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी येथे मानवी तस्करी व व्यापारी लैंगिक शोषणाचे बळी योजना २०१६ विषयी जागरुकता कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये दिवाणी न्यायाधीश क.स्तर के. एस. जोशी यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस आणि कल्याणकारी योजना आणि दिव्यांग व्यक्ती यांच्या संपर्काबाबत जागरुकता या विषयी व बालिका दिवसाचे महत्व विशद केले आणि दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासाठी असणा-या कल्याणकारी योजना याचे संपर्काबाबत माहिती दिली व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची दिव्यांगकरीता असलेली योजनेची सखोल माहिती दिली. आपल्या शेजारी अगर नातलगामध्ये अशा व्यक्ती असतील तर त्यांना ही माहिती देवून अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.
पोलीस नाईक, अॅंटी ह्युमन ट्राफीकींग युनीटच्या मोनाली निकम यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची मानवी तस्करी व व्यापारी लैंगिक शोषणाचे बळी योजना २०१६ या विषयी मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी मानवी तस्करी व व्यापार या बाबत घडलेले गुन्हे याची उदाहरणे दिली. त्यामुळे होणारे परिणाम व या गुन्ह्यासाठी असलेल्या शिक्षा याबाबत माहिती देवून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनेनुसार विधी सहाय्य मिळते याची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी दिलीप भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.